मोहोळ : ट्रॅक्टर, पिकअप अशी मोठी वाहनेही चोरणारे चोर मोहोळ पोलिसांच्या तावडीत सापडले असून त्यांच्याकडून २५ लाख ४५ हजाराचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.
दुचाकी चोरांचा सगळीकडेच सुळसुळाट आहे, कधी कुठल्या ठिकाणची दुचाकी चोरीला जाईल याचा भरवसा राहिलेला नाही. पोलीस अनेक दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळतात, त्यांच्याकडून चोरलेल्या दुचाकी मोठ्या प्रमाणात जप्त करतात आणि दुचाकी चोरांना गजाआड देखील करतात पण दुचाकी चोरीच्या घटना मात्र सुरूच राहतात. चोरांच्या नजरा आता ट्रॅक्टर, पिकअप वाहनाकडेही गेल्या असून माढा, करमाळा, भूम, मुरुड अशा ठिकाणावरून तीन ट्रॅक्टर, दोन पिकअप चोरीला गेल्याची फिर्याद संबंधित पोलीस ठाण्यात दाखल देखील झाल्या आहेत. ही वाहने चोरणारे तिघे मोहोळ पोलिसांच्या आयतेच जाळ्यात आले आणि त्यांच्याकडून तीन ट्रॅक्टर, दोन पिकअप आणि एक बुलेट असा २५ लक्ष ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे .
मोहोळ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला तिघे जण संशयितरित्या फिरत असलेले सावळेश्वर परिसरात दिसून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी आपल्या पद्धतीने केली असता हे तिघेही वाहन चोर असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले आणि न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी दिली. कोठडी दरम्यान पोलिसांनी त्यांची चोकशी सुरु केली आणि त्यांनी चोरलेल्या वाहनांचा शोध लागला. (Tractor thief caught in Solapur district)परांडा तालुक्यातील वडणेर येथील सतीश शहाजी खाडेकर, बार्शी तालुक्यातील उंडेगाव येथील विशाल संभाजी मेरड आणि विशाल लक्ष्मण खळबट या तिघांनी चोरीची वाहने पोलिसांना काढून दिली.
माढा, करमाळा, भूम, मुरुड येथून या चोरटयांनी तीन ट्रॅक्टर, दोन पिकअप चोरले होते तर एक बुलेट पुण्यातून चोरली होती. सदर भामटे मोठी वाहने चोरायचेच पण त्या वाहनात भरण्यासाठी डिझेलची देखील चोरी करायचे. पुण्यातून बुलेट चोरून आणली पण सावळेश्वर टोळ नाक्याच्या परिसरात तिघेही मोहोळ पोलिसांच्या जाळ्यात सापडले आणि त्यांच्याकडील चोरीची वाहने देखील पोलिसांनी हस्तगत केली. पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलिसांनी या चोरीचा छडा लावला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !