इस्लामपूर : आमदार सदाभाऊ खोत यांचे सांगोल्याच्या हॉटेलचे कथित बिल स्वाभिमानी शेतकरी संघटना भीक मागून भागवणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सांगितले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून सदाभाऊ खोत सांगोल्याच्या कथित हॉटेल बिलावरून प्रचंड वादात सापडले आहेत. सांगोला तालुक्यातील एका हॉटेल मालकाने त्यांचा ताफा रोखून 'आधी माझ्या हॉटेलचे जुने बिल भागवा आणि मगच पुढच्या कार्यक्रमाला जावा' असे निक्षून सांगितले आणि हा विषय राज्यभर गाजला. २०१४ साली सदाभाऊ खोत यांनी माधा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती त्यावेळचे हे बिल असून सदाभाऊ खोत आपला फोन उचलत नाहीत आणि उचलला तर नीट बोलत नाहीत असे म्हणत हॉटेल मालक अशोक शिनगारे यांची आपल्या ६६ हजाराच्या थकीत बिलासाठी त्यांच्याकडे आग्रह धरला. कार्यकर्त्यांच्या गराड्यात काहीतरी उत्तरे देत सदाभाऊ खोत यांनी तेथून पाय काढला पण सदर प्रसंगाचे चित्रण राज्यभर व्हायरल झाले.
आमदार सदाभाऊ खोत यांनी 'आपण या हॉटेल मालकाला ओळखत नसल्याचे' सांगितले. नंतर मात्र अशोक शिनगारे हे हॉटेल मालक राष्ट्रवादीचे असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती सदाभाऊ यांनी पत्रकारांना दिली. हॉटेल मालकाने हा दावा खोडून काढत आपला राष्ट्रवादीशी काहीच संबंध नाही, आपण शेतकरी संघटनेत काम करीत होतो असे स्पष्ट केले आहे. दरम्यान सोशल मीडियावर मात्र सदाभाऊ यांच्यावर जोरादार टीका होत राहिली. "हॉटेल मालक कुठल्या पक्षाचा आहे की नाही हा भाग वेगळा आहे, त्यांचे पैसे आधी देवून टाका" इथपासून ते अत्यंत असभ्य भाषेत देखील अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
टोमॅटोसारखे गाल असलेल्या राष्ट्रवादीच्या एका नेत्याच्या सांगण्यावरून अशोक शिनगारे यांनी आपल्याला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान केले असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले पंरतु सदर हॉटेल मालकाचा राष्ट्रवादीशी संबंध नसल्याचे समोर आल्याने सदाभाऊंच्या या आरोपातील हवा निघून गेली आहे. निवडणुकीतील हॉटेलचे बिल दिले नसल्याचा आरोप अशोक शिनगारे यांनी केला आहे तर आपण शिनगारे याना ओळखत नसल्याचे खोत यांनी सांगून हात झटकले आहेत पण या प्रकाराने सदाभाऊ यांच्या प्रतिमेला धक्का नक्कीच लागला आहे. त्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वेगळाच पवित्रा घेतला आहे. (Sadabhau Khot's hotel bill will be collected by begging) सदर घटनेमुळे वाळवा तालुक्याची बदनामी आणि अपमान झाला आहे अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची भावना झाली आहे.
सांगोला तालुक्यातील हॉटेलचे बिल बुडविल्याने हॉटेल मालकाने माजी मंत्री सदाभाऊ खोत याना रस्त्यात अडविल्याने वाळवा तालुक्याची बदनामी झाली आहे, तालुक्याचा हा अपमान आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते भीक मागून संबंधित हॉटेलचे बिल भागवणार आहेत अशी माहिती स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे आणि भागवत जाधव यांनी दिली आहे. सदाभाऊ खोत यांच्या सदर घटनेची चर्चा महाराष्ट्रभर सुरु आहे, सदाभाऊ खोत हे वाळवा तालुक्यातील आहेत त्यामुळे उधारीवरून आमच्या वाळवा तालुक्याची बदनामी करू नका, त्यांची हॉटेलची ६६ हजार ४५० रुपयांची उधारी आम्ही भीक मागून भरणार आहोत असे त्यांनी सांगितले आहे.
आणखी उधारी असेल तर --
येथून पुढे सदाभाऊ खोत याना उद्धारासाठी कुणीही अडवू नका आणि आमच्या वाळवा तालुक्याची बदनामी करू नका, सदाभाऊ हे पूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत होते. त्यांच्याकडे अजून कुणाची उधारी असेल तर आमच्याशी संपर्क करा, आम्ही भीक मागून ती उधारी चुकती करू असेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे आणि भागवत जाधव यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !