BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ जून, २०२२

किरकोळ रकमेची लाच घेताना तिघे रंगेहात पकडले !

 



मोहोळ :  पाचशे रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने तिघांना पकडले असून पाणी पुरवठा कामाचा मंजुरी आराखडा तयार करण्यासाठी या लाचेची मागणी करण्यात आली होती.


अलीकडे लाचखोरीचे प्रमाण प्रचंड वाढलेले असून शिपायापासून साहेबांपर्यंत अनेकजण लाच घेताना सतत रंगेहात सापडत आहेत. यात खाजगी व्यक्तींचा आणि लोकप्रतिनिधी यांचाही समावेश असल्याचे दिसून येते. महसूल, पोलीस या विभागातील अधिकारी, कर्मचारी हे अधिक प्रमाणात लाचखोरीत सापडत आहेत तर अन्य शासकीय खात्यात देखील जवळपास अशीच  परिस्थिती असते. अत्यंत सामान्य कामासाठीसुद्धा चिरीमिरी दिली आणि घेतली जाते पण ज्यांची लाचेसाठी पिळवणूक होते ते हमखास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतात आणि लाचखोर त्यांच्या सापळ्यात अलगद अडकतात. काही किरकोळ रकमेसाठी शासकीय नोकरी धोक्यात येते तरी देखील लाचेचा मोह सुटताना दिसत नाही. मोहोळ तालुक्यात शाखा अभियंता, कनिष्ठ सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक असे तिघे जण पाचशे रुपयाच्या लाच प्रकरणी गोत्यात आले आहेत. 


मोहोळ तालुक्यातील हिंगणी (नि.) येथील मागासवर्गीय वस्तीतील पाणी पुरवठा योजनेचा निधी मंजूर झालेला आहे, या कामाचा मंजूर आराखडा तयार करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच मागण्यात आल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पोहोचली. जिल्हा परिषद समाज कल्याण विभागांतर्गत, पाणी पुरवठा विभागाकडून अनुसूचित जाती वस्ती विकास कामासाठी पाणी पुरवठा पाईपलाईन टाकण्याच्या कामासाठी मंजुरी देण्यात आली आहे. सदर कामाचे अंदाजपत्रक लवकर तयर करून देण्यासाठी, तांत्रिक कामास मंजूर करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.  मोहोळ पंचायत समितीच्या अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील शाखा अभियंता हेमंत राजाभाऊ विधाते, कनिष्ठ सहाय्यक सिद्राम मल्लिकार्जुन वैधकर, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक गंगाधर हणमल्लू यांच्यासाठी ५००, २०० आणि ३०० अशा लाचेची मागणी करण्यात आली होती. विधाते यांनी ही लाच मागितली आणि इतर दोघांनी त्यासाठी संमती दिली होती.

 
लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या पडताळणीत निष्पन्न झाल्यानंतर या विभागाने सापळा लावला आणि पाचशे रुपयांची लाच स्वीकारत असताना विधाते यास रंगेहात पकडण्यात आले. सदर तिघांच्या विरोधातही याबाबत कारवाई करण्यात आली आहे. (Three redhands were caught taking bribes) चार आकडी सरकारी पगार घेणारे दोनशे, तीनशे आणि पाचशे रुपयांच्या लाचेसाठी मोठ्या गोत्यात आल्याची चर्चा मोहोळ तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात रंगू लागली आहे.     


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !