पंढरपूर : वाढत्या कोरोनाच्या सावटात आषाढी यात्रा होणार असून आषाढी यात्रेसाठी मास्क सक्ती केली जाणार असून लक्षणे आढळल्यास त्या रुग्णास विलगीकरणात ठेवले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
राज्यात सर्वत्र कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाच आषाढी यात्रेला शासनाने परवानगी दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून आषाढी आणि अन्यही यात्रेवर कोरोनाचे संकट होते त्यामुळे पंढरीची वारी करता आली नाही. पिढ्यानपिढ्या एकही वारी चुकली अथवा चुकवली जात नव्हती परंतु कोरोनाने दोन वर्षे या वारीत विघ्नं आणली. यावर्षी आषाढी यात्रेस शासनाने परवानगी दिली आहे त्यामुळे यंदाची आषाढी वारी विक्रमी गर्दीची होण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपासून वारीला येता न आल्याने यंदा मोठ्या संख्येने भाविक पंढरीला येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
एकीकडे वारीचा उत्साह वाढत असताना दुसरीकडे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार होण्याची अधिक शक्यता असते आणि आषाढी वारीसाठी जवळपास पंधरा लाख वारकरी एकत्र येत असतात त्यामुळे कोरोनाची भीती सदैव असते. देशात आणि राज्यात गेल्या महिन्यापासून कोरोनाने पुन्हा आपले हातपाय पसरायला सुरुवात केली असून रुग्णांची वाढ देखील वेगाने होत आहे. अशा परिस्थितीत आषाढीचा सोहळा साजरा होत आहे. वारीचा उत्साह असला तरी पंढरीच्या स्थानिक नागरिकात देखील कोरोना प्रसाराची धाकधूक आहे.
कोरोनाच्या सावटात होत असलेल्या आषाढी यात्रेसाठी प्रशासन मात्र सर्व प्रकारची काळजी घेताना दिसत आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तर आषाढीत मास्क बंधनकारक करणार असल्याची माहिती दिली आहे. शासनाने आषाढी वारीला परवानगी दिली असली तरीही वारकरी आणि भाविकांना काही निर्बंध पाळावेच लागणार असून ते सर्वांच्याच हिताचे असणार आहेत. (Mask is mandatory for Pandharapur Ashadi Yatra)आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून लक्षणे दिसताच संबंधिताना तातडीने विलगीकरणात ठेवले जाणार आहे. आषाढी वारीसाठी येणाऱ्या सर्व भाविकांना मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले जाणार आहे.
मास्क, सॅनिटायझर आवश्यक
वारीला येणाऱ्या भाविकांसाठी मास्क आणि सॅनिटायझर आवश्यक असून भाविकांनी याचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. वारीची होणारी गर्दी आणि राज्याच्या विविध भागातून येणारे भाविक याचा विचार करता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेणे हे सर्वाधिक महत्वाचे ठरणार आहे.
कोरोनाचे रुग्ण वाढतेच !
काल दिवसभरात राज्यात पुन्हा ३ हजार ८८३ नवे रुग्ण वाढले असून राज्याच्या विविध भागातील हे रुग्ण आहेत. मुंबई विभागात सर्वाधिक रुग्णवाढ असून मागील २४ तासात मुंबई विभागात ३ हजार ३१७ रुग्णांची नवी वाढ आहे. पुणे विभागात ३३९ नव्या रुग्णांची वाढ झाली असून नाशिक - ४९, कोल्हापूर - ४७, औरंगाबाद - २३, अकोला - २६, नागपूर विभाग ७६ अशी विभागावर नवी वाढ आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !