सांगोला : 'सदाभाऊ, आधी निवडणुकीत केलेली हॉटेलची उधारी द्या, मग पुढे जा ' असे म्हणत सांगोल्यातील हॉटेल मालकाने चक्क माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा ताफाच रोखला आणि बिलांसाठी गोंधळ घातला. सदाभाऊ यांनी मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने गोंधळ घातल्याचे म्हटले आहे.
पंचायत राज समितीचे एक पथक आज सांगोल्यात आले होते. आमदार अनिल पाटील, आ. डॉ. देवराव होळी, आ. किशोर दराडे यांच्यासमवेत सदाभाऊ खोत हे देखील होते. या पथकाने महूद येथील ग्रामपंचायतीची पाहणी केली आणि ते सांगोला पंचायत समितीच्या कार्यालयाकडे आले. पंचायत समितीच्या आवारात प्रथम सदाभाऊ खोत यांची गाडी आली आणि खोत गाडीतून खाली उतरले. याचवेळी सांगोला तालुक्यातील मांजरी येथील हॉटेल मालक आणि शेतकरी संघटनेचे तत्कालीन पदाधिकारी असलेले अशोक शिनगारे हे सदाभाऊ यांच्याकडे गेले आणि त्यांनी हॉटेलचे जुने बिल मागितले. "सदाभाऊ, तालुक्यात तुमचे स्वागत आहे पण २०१४ सालच्या निवडणुकीतील माझी हॉटेलची उधारी तेवढी द्या,आणि मगच पुढच्या कार्यक्रमासाठी जा ...तुम्ही आमचा फोन घेत नाही आणि कधी घेतलाच तर व्यवस्थित बोलतसुद्धा नाही " असे अशोक शिनगारे सदाभाऊ खोत यांना म्हणाले.
ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य असलेले अशोक शिनगारे यांचे हॉटेल असून २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून सदाभाऊ खोत यांनी निवडणूक लढवली होती. यावेळी सदाभाऊ खोत यांच्याकडे शिनगारे यांच्या हॉटेलची उधारी होती. ही उधारी त्यांना मिळाली नसल्याने आणि मिळतही नसल्याने शिनगारे हे आक्रमकपणे सदाभाऊकडे उधारी वसुल करण्याचा प्रयत्न करीत होते. हॉटेलमध्ये पार्टी करून त्याचे बिल दिले नसल्याचा दावा शिनगारे यांनी केला आहे. (Sadabhau Khot's Convoy stopped for borrowing recovery)या प्रकाराने पंचायत समितीच्या आवारात एक वेगळाच गोंधळ निर्माण झाला आणि नंतर या घटनेची जिल्हाभर चर्चा सुरु झाली आहे.
ओळखत नाही - सदाभाऊ
हॉटेल मालकाला आपण ओळखत नसून सदर व्यक्ती राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, राष्ट्रवादीला आपला आवाज दाबता येणार नाही, काळे झेंडे दाखवून हे निदर्शने करणार होते पण आपला ताफा लवकर आला आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यामुळे त्यांचे नियोजन बारगळले आहे. आपण या व्यक्तीला ओळखतही नाही शिवाय २०१४ पासून पंधरा वेळा आपण सांगोल्यात येऊन गेलो आहे. केवळ बदनाम करण्याचा हा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे असे सदाभाऊ यांनी स्पष्ट केले.
बिल थकवले नाही !
आपण कुठलेही बिल थकवलेले नाही शिवाय दहा वर्षे हा गप्प कसा होता ? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे. शिवाय सदर हॉटेल मालकाच्या विरोधात सांगोला पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला असल्याची माहिती देखील खोत यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !