BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ जून, २०२२

पंढरपूर, सांगोल्यातील ९ जण एक वर्षासाठी तडीपार !

 


सोलापूर : टोळी निर्माण करून नागरिकांत दहशत आणि गुन्हे करीत असलेल्या तीन टोळ्यातील  पंढरपूर, सांगोला परिसरातील ९ जणांच्या विरोधात सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी हद्दपारीची कारवाई केली आहे.


सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी सतत काही न काही उपक्रम राबविले आहेत. फरार असलेल्या अनेक अट्टल चोरटे आणि सराईत गुन्हेगार यांना कौशल्याने पकडून त्यांना गजाआड केलेले आहे. समाजात दहशत निर्माण करणारे जिल्ह्यातील अनेक गुंडांना हद्दपार केले आहे, आता पुन्हा पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातील ९ जणांच्या विरोधात हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे, पंढरपूर तालुक्यात वाळू तस्करांचा मोठा प्रभाव आहे. प्रशासनाने अनेकदा कारवाई करूनही काही वाळू चोरी वाळूची तस्करी केल्याशिवाय थांबताना दिसत नाहीत. अवैध वाळू चोरीच्या पैशातून गुन्हेगारी देखील फोफावण्यास मदत होत आहे. पंढरपूर तालुक्यातील वाळू विषयक गुन्हे दाखल असलेल्या काही जणांचा या तडीपारीत समावेश आहे.


पंढरपूर तालुक्यातील आंबे येथील शंकर उर्फ बिनु लिंगा भोसले, कास अण्णा गोडसे, महेश जीवाप्पा कोळी, भय्या उत्तम शिंदे यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत, पंढरपूर ग्रामीण आणि पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर वाळूविषयी गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी कृत्याला आळा घालण्यासाठी या चौघांना पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, माळशिरस, करमाळा या तालुक्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. (Nine accused from Pandharpur, Sangola deported for one year) पंढरपूर तालुक्यातील चार तर सांगोला तालुक्यातील पाच जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.


सांगोला तालुक्यातील अनिकेत बापूराव काळे आणि अक्षय विजय इंगोले (रा. वज्राबाद पेठ, सांगोला)  यांच्याविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात मालाविषयक आणि शरीर विषयक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सांगोला तालुका आणि परिसरात त्यांनी दहशत निर्माण केली असल्याने त्यांच्यावर ही करवाई करण्यात आली आहे. या दोघांना एक वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. सांगोल्याच्या एकतपूर रोडवरील मस्के कॉलनीतील रविराज दिलीप मस्के, धनगर गल्लीतील अजिंक्य बिरुदेव माने, सांगोला शहारातील लखन रामचंद्र चव्हाण या तिघांना सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी या तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. 


जिल्हा पोलिसांच्या या कडक आणि धडक कारवाईमुळे अन्य अपराध्यांचे धाबे दणाणले असून आणखी काही जणांचा तडीपारीचा प्रस्ताव आहे त्यामुळे आगामी काळात आणखी काही जणांना या कारवाईला सामोरे जावे लागू शकते. हद्दपार केलेल्या व्यक्ती जर हद्दपार करण्यात आलेल्या क्षेत्रात वावरत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत तत्काळ संबंधित पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्ष येथे कळविण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे.      


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !