BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ एप्रि, २०२२

पंढरीत सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'वाईट वाटून घेऊ नका !

 


पंढरपूर : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना पंढरीत ब्राह्मण समाज बांधवांनी रोखले पण 'आपल्याला काही माहित नाही, तुम्ही वाईट वाटून घेवू नका' असे सांगून त्या निघून गेल्या. 


राष्ट्रवादीच्या खासदार आणि जेष्ठ नेते शरद पवार यांच्या सुकन्या सुप्रिया सुळे यांनी पंढरीत विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी आल्या होत्या. मंदिरातून त्या बाहेर येताच काही ब्राह्मण समाज बांधवांनी त्यांना रोखले आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विधानाबाबत तक्रार केली. आमदार अमोल  मिटकरी हे सतत वादग्रस्त वक्तव्य करीत समाजात तेढ निर्माण करीत आहेत त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी ब्राह्मण समाज बांधव करीत होते. सुप्रिया सुळे यांनी अत्यंत शांतपणे त्यांचे ऐकून घेत अमोल मिटकरी काय म्हणाले आहेत हे आपण ऐकलेले नाही आणि आपल्याला काही माहिती नाही असे उत्तर त्यांनी दिले.  


सांगली जिल्ह्यातील एक कार्यक्रमात आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजातील पुरोहीताबाबत बोलताना केलेल्या विधानांचे पडसाद सगळीकडे उमटताना दिसत आहेत. सुप्रिया सुळे पंढरीत आल्यामुळे येथे देखील काही समाज बांधवांनी आपल्या प्रतिक्रिया त्यांच्याजवळ व्यक्त केल्या तसेच मिटकरी यांच्या विधानांचा निषेध नोंदण्याचा प्रयत्न केला. सुळे यांच्याकडे मिटकरी यांच्याबद्धल तक्रार करताच 'एखादे वेळी काही झाले असेल तर --' असे सुळे म्हणताच 'त्यांचे हे  नेहमीचे आहे' असे ब्राह्मण समाजाकडून सांगण्यात आले. गर्दीगोंगाटात यावेळी फार काही चर्चा झाली नाही परंतु ब्राह्मण समाजाच्या भावना आणि प्रतिक्रिया मात्र सुळे यांच्यापर्यंत पोहोचल्या. 


ट्वीट करण्याची मागणी 

खासदार सुप्रिया सुळे यांनी अमोल मिटकरी यांच्या विधानाबाबत काही माहित नसल्याचे सांगूनही ब्राह्मण समाज बांधव त्यांना एखादे ट्वीट करण्याचा आग्रह करीत होते. तुम्हाला सगळे फॉलो करतात त्यामुळे तुम्ही या विषयावर ट्वीट करावे अशी मागणी होत होती परंतु सुळे यांनी त्याकडे विशेष लक्ष दिले नाही. 


कानावर हात !

अमोल मिटकरी यांच्या विधानावर सुप्रिया सुळे यांनी कानावर हात ठेवले. 'आपल्याला काहीच माहिती नाही पण तुम्ही दुखावला असाल तर मी सांगते, आपण वाईट वाटून घेवू नका' अशा शब्दात ब्राह्मण समाजाची समजूत काढून त्यांनी वेळ मारून नेली.    


ब्राह्मण समाज संतप्त !

अमोल मिटकरी यांच्या इस्लामपूर येथील सभेतील विधानावर ब्राह्मण समाज संतप्त झालेला आहे. मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाची खिल्ली उडविली असल्याचा आरोप केला जात आहे. या विधानाबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी माफी मागावी अशी मागणी देखील होताना दिसत आहे, मिटकरी यांनी मात्र हा आरोप सपशेल फेटाळला आहे. 


विपर्यास कशासाठी ?

माझ्या विधानामुळे कुठल्याही समाजाचा अपमान झालेला नाही, माझा व्हिडीओ व्यवस्थित पहिला जावा. आपण कन्यादानाच्या एका प्रसंगावर बोलताना स्पष्टीकरण दिले आणि मंत्राचा अर्थ सांगितला आहे. माझ्या विधानांचा विपर्यास केला जातोय, ही मंडळी भाजप प्रणीत आहेत काय हे देखील तपासावे लागेल असे मिटकरी म्हणाले आहेत. आपण कुठल्याही धर्माचा अपमान केलेला नसून आपणास आलेला अनुभव आपण मांडला आहे. महाराष्ट्रात कुठेही जातीय सलोखा बिघडू नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. माझा तोच प्रयत्न आहे तसा त्यांचाही असावा अशी अपेक्षा मिटकरी यांनी व्यक्त केली आहे.  


हे देखील वाचा :   (बातमीवर क्लिक करा )

 अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !          




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !