BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ मार्च, २०२२

सोलापूरच्या पालकमंत्र्यांचे अंधारात भूमिपूजन !





इंदापूर : शेतकरी विजेसाठी आक्रोश करीत असतानाच सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना देखील विजेचे 'खेळा'चा सामना करावा लागला आणि आपला भूमिपूजनाचा कार्यक्रम अंधारातच उरकण्याची वेळ आली.


सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री शेजारच्या  इंदापूर तालुक्यातील रहिवाशी आहेत. सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी विजेसाठी प्रचंड आक्रोश करीत आहेत. शेतशिवार सोडून रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तरी शेतकऱ्यांचा आवाज मुंबईपर्यंत पोहोचवावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यासाठी कालच सोलापूर जिल्ह्यात त्यांना अनेकांनी साकडे देखील घातले आहे. संभाजी ब्रिगेडने तर त्यांचे कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा देखील दिला होता. संतापलेल्या सोलापूर जिल्ह्यात काल त्यांचे कार्यक्रम होते त्यामुळे ते जिल्ह्यात आले होते. 


शेतकरी विजेसाठी रस्त्यावर उतरलेले असताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना देखील विजेचा खेळाचा अनुभव त्यांच्याच कार्यक्रमात घ्यावा लागला. काल संध्याकाळी सोलापूर - पुणे महामार्गावर असलेल्या शहा पाटी येथे १२ कोटी १५ लाख खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ सोलापूरचे पालकमंत्री भरणेमामा यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमावेळीच अचानक विद्युत पुरवठा खंडित झाला आणि कार्यक्रम स्थळी अंधाराचे साम्राज्य पसरले. यावेळी मंत्री असलेल्या भरणे मामा यांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोबाईलच्या लाईट सुरु करण्याच्या सूचना द्याव्या लागल्या. 


काही वेळ वीज पुरवठा सुरळीत होण्याची वाट पाहिली गेली पण महावितरणचा उजेड काही केल्या पडलाच नाही, अखेर अंधारातच भूमिपूजन सोहळा साजरा झाला. दस्तूरखुद्द मंत्र्यांनाच हा फटका बसला.  महावितरणच्या वीज तोडणी मोहिमेची ही झळ मंत्र्यांना बसली असल्याचे सांगण्यात आले. राज्याचे मंत्री असलेल्या सोलापूरच्या पालकमंत्र्यांना आपला कार्यक्रम अंधारात उरकावा लागला आणि भरणेमामा पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले. अनेक ठिकाणी विकास कामांची उद्घाटने होती परंतु तेथे मात्र सुरळीत विद्युत पुरवठा होता त्यामुळे उत्साहात ते कार्यक्रम  साजरे झाले.       


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !