पंढरपूर : कोरोनाची तिसरी लाट आता संपण्याच्या मार्गावर असतानाच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माढासह अन्य काही शहरातून कोरोना हद्दपार झाला आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पंढरपूर तालुका रुग्णसंख्येबाबत सर्वात पुढे राहिला आहे आणि कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची सर्वाधिक संख्या देखील पंढरपूर तालुक्यातीलच आहे, बार्शी, मंगळवेढा हे तालुकेही त्या खालोखाल होतेच. कोरोनाची तिसरी लाट ओसरत निघाली तरी पंढरपूर, बार्शी, माढा, माळशिरस अशा काही तालुक्यात कोरोनाचे सक्रीय रुग्ण होते. आता मात्र आनंददायी आणि दिलासादायक बातमी आली असून सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) काही तालुके आणि मोठी शहरे कोरोनामुक्त झाले आहेत.
पहिल्या दोन्ही लाटेत सर्वाधिक रुग्णसंख्य असलेल्या पंढरपूर तालुक्यात पंढरपूर शहर, अक्कलकोट करमाळा, माढा, माळशिरस या शहरातून कोरोना हद्दपार झाला आहे. सोलापूर जिल्यातील अक्कलकोट, दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुके कोरोनामुक्त झाले आहेत तर बार्शी आणि मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भाग कोरोनामुक्त झाला आहे. सोलापूर शहरात कोरोनाचे केवळ तीन रुग्ण सक्रीय आहेत तर सोलापूर जिल्हा ग्रामीणमधील फक्त वीस रुग्णांवर सद्या उपचार सुरु आहेत. त्यामुळे अवघा सोलापूर जिल्हाच आता कोरोनामुक्तीच्या अखेरच्या टप्प्यात आला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने प्रचंड हाहा:कार माजवला होता. रुग्णालय आणि स्मशानातही जागा मिळत नव्हती परंतु तिसरी लाट त्या तुलनेत सौम्य झाली. मोठ्या प्रमाणात झालेल्या लसीकरणामुळे ( Corona vaccination) तिसऱ्या लाटेची तीव्रता अधिक जाणवली नाही आणि ही लाट अधिक काळ टिकली देखील नाही. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत सोलापूर जिल्हा राज्यातील पहिल्या दहा जिल्ह्यात कायम राहिला होता पण आता तो कोरोनामुक्त होताना दिसत आहे.
उरले २० रुग्ण !
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आता केवळ २० रुग्ण उरले असून नव्याने होणारी वाढ थांबली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात आता केवळ ३ रुग्ण आहेत तर माढा तालुक्यात ४ रुग्ण आहेत. करमाळा - १, बार्शी - १, माळशिरस-१, मंगळवेढा-२, मोहोळ -५, सांगोला ३ असे २० रुग्ण ग्रामीण भागात आहेत. दोन्ही लाटेत आघाडीवर असणाऱ्या ग्रामीण भागात देखील आता कोरोना पूर्ण हद्दपार होण्याच्या अंतिम स्थितीत आहे.
अक्कलकोट, दक्षिण आणि उत्तर सोलापूर हे तीन तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत तर पंढरपूर, माढा, माळशिरस, करमाळा या शहरातून कोरोना हद्दपार झाला आहे. या चार शहरात आता एकही कोरोनाचा रुग्ण नाही. बार्शी आणि मंगळवेढा तालुक्यात ग्रामीण भागातून कोरोना हद्दपार झालेला आहे. येत्या काही दिवसात संपूर्ण सोलापूर जिल्हा हा कोरोनामुक्त झाल्याचे चित्र दिसणार आहे. (Solapur district on the threshold of coronation ) हा एका मोठा दिलासा लाभताना दिसत आहे.
चीनमध्ये हाहा:कार !
कोरोनाचा उगम झालेल्या चीन मध्ये पुन्हा एकदा कोरोनाने हाहा:कार माजवला आहे त्यामुळे जगातील इतर देशानाही चिंता लागलेली आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेची चर्चा असून चीनमध्ये अनेक मोठी शहरे पुन्हा लॉकडाऊन करण्यात आली आहेत त्यामुळे कोरोनाचा प्रभाव संपत आला असला तरी अद्याप कोरोना समूळ नष्ट झालेला नाही. कोरोनाचे सद्या असलेले निर्बंध आणि नियम पाळून चौथी लाट येणारच नाही एवढी खबरदारी घेणे हे मात्र जिल्ह्यातील नागरिकांच्या हातात आहे.
हे वाचा : वाचण्यासाठी बातमीवर क्लिक करा :

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !