मुंबई : पंढरपूर तालुक्यातील शेतकरी सुरज जाधव यांच्या आत्महत्येचे वास्तव समोर आले असून राजकीय भांडवल केले गेलेली ही आत्महत्या विजेसाठी नव्हे (Suraj Jadhav Suicide) तर आर्थिक अडचणीतून झाल्याचे उर्जामंत्री यांनी विधानसभेत स्पष्ट केले आहे.
पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील शेतकरी सुरज जाधव यांनी व्हिडीओ बनवत विष प्राशन करून आत्महत्या केली होती आणि दोन दिवसांनी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेने सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात खळबळ उडाली होती. महावितरणकडून थकीत शेतकऱ्यांच्या विजेचा पुरवठा तोडण्याची मोहीम सुरु होती आणि यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत येत होता. यावेळीच ही आत्महत्या झाल्याने महावितरणच्या या मोहिमेमुळे सुरज जाधव यांनी आत्महत्या केली अशी चर्चा सुरु झाली. वास्तविक आत्महत्येपूर्वी सुरज जाधव यांनी केलेल्या व्हिडीओ चित्रीकरणात शासन धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली होती परंतु महावितरण बाबत कसलीही तक्रार करण्यात आली नव्हती.
महावितरणच्या वीज तोड मोहिमेचा पहिला बळी म्हणून काहींनी हा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न केला तर जाधव याच्या मृत्यूबाबत राज्यभर राजकारण झाले. विधानसभेत देखील हा मुद्दा आला आणि विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी याबाबत सरकराला जाब विचारला. दरम्यान सुरज जाधव यांची आत्महत्या ही महावितरणमुळे झाली नसल्याचे महावितरण अधिकारी सातत्याने बोलत होते. (Suraj Jadhav commits suicide due to financial difficulties) आत्महत्येसारखा संवेदनशील विषय असल्याने या विषयावर कुणी उघडपणे सत्य बोलायला धजावत नव्हते परंतु राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी याबाबत विधानसभेत स्पष्टीकरण दिले आहे आणि सुरज जाधव यांच्या आत्महत्येचे नेमके कारण त्यांनी सांगितले आहे.
पंढरपूर तालुक्यातील शेतकरी सुरज जाधव यांची आत्महत्या ही आर्थिक अडचणीतून झाली असल्याची माहिती उर्जामंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत दिली. सोलापूर जिल्हा कृषी अधिकारी यांनी याबाबत एक अहवाल शासनाला दिला असून त्यानुसार सुरज जाधव अथवा त्यांचे वडील राम जाधव यांनी महाडीबीटी योजनेच्या अंतर्गत अर्ज देखील केलेला नव्हता शिवाय त्यांचे कोणतेही अनुदान प्रलंबित नव्हते. अतिवृष्टी अथवा नापिकीमुळे देखील त्यांचे काही नुकसान झालेले नाही असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आर्थिक अडचण !
सुरज जाधव यांचे वडील राम जाधव यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेकडून दुग्ध व्यवसायासाठी ५ लाख ६० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते पण या कर्जाच्या वसुलीसाठी देखील कुणी त्यांच्याकडे तगादा लावलेला नव्हता. दुध व्यवसायात खर्च अधिक होत असल्यामुळे पैशाची कमतरता भासत होती आणि यातील नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केली आहे. सुरज जाधव यांच्या कुटुंबियांची कुणाच्याही विरोधात तक्रार नाही असे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत सांगितले आहे.
वीज जोडणीच नाही !
महावितरणकडून वीज तोडल्यामुळे सुरज जाधव यांनी आत्महत्या केल्याचे म्हटले जात होते पण सुरज जाधव यांच्याकडे कृषी पंपाची वीज जोडणीच नाही असे समोर आले आहे. सुरज याच्या आजोबाच्या नावाने जुनी वीज जोडणी आहे शिवाय सुरजचे वडील राम जाधव यांच्याकडे घरगुती वीज जोडणी आहे आणि त्यावर ७३० रुपयांची थकबाकी आहे. या दोन्ही जोडणीबाबत महावितरण कडून कसलाही तगादा लावण्यात आलेला नव्हता असे देखील उर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
उत्तराने चपराक !
सुरज जाधव यांनी आपल्या अडचणीमुळे आत्महत्या केल्याने पंढरपूर तालुक्यात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. अत्यंत तरुण वयातील आत्महत्या ही अनेकांना चटका लावून गेली आहे पण काहींनी या आत्महत्येचे देखील भांडवल केले आणि वास्तव समोर आल्याने त्यांना जोरदार चपराक बसली आहे. या आत्महत्येला वेगळे स्वरूप दाखवून राजकारण करण्याचा प्रयत्न झाला आहे (Politics of Suraj Jadhav suicide) याची चर्चा खाजगीत देखील पंढरपूर तालुक्यात सुरु होती परंतु संवेदनाशील विषयामुळे कुणी उघड बोलायला तयार होत नव्हते. शासनाने मात्र विधानसभेत या आत्महत्येचे वास्तव मांडले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !