BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ मार्च, २०२२

वीज आठ तास पण रोहित्र करणार बंद !

 



पंढरपूर : वीज उपकेंद्राच्या ठिकाणाहून विद्युत पुरवठा पूर्ववत आठ तासांचा करण्यात आला आहे परंतु वीज बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांचे रोहित्र बंद करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकरीवर्गाची चिंता काही केल्या कमी होताना दिसत नाही. 


महावितरणने सुरु केलेल्या कारवाईच्या मोहिमेमुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. प्रचंड थकबाकीमुळे महावितरण आर्थिक अडचणीत आले असतानाच शेतकरी थकीत वीज बिले भरण्यास असमर्थता दाखवत आहेत. महावितरण कडून थकीत शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तोडला जात आहे. यामुळे उभी पिके जाळून जाण्याचे संकट बळीराजावर आले आहे. महावितरण अधिकाऱ्यांच्या नावाने शिवारात शिमगा होत आहे तर या अधिकारी वर्गाला वसुलीचे प्रचंड दडपण आहे. अपेक्षित वसुली करण्याचा तगादा या अधिकाऱ्यांना वरिष्ठ पातळीवरून आहे. वापरलेल्या विजेचे पैसे वसूल करणे हे महावितरणसाठी आवश्यक बनले आहे परंतु शेतकऱ्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. 


दिवसा दहा तास शेतीसाठी वीज द्यावी य मागणीसाठी शेतकरी आक्रोश करत आहेत तर दुसरीकडे महावितरण रात्री मिळत असलेल्या विजेचा कालावधी कमी करीत आहे. जागोजागी शेतकरी महावितरणच्या विरोधात रस्त्यावर उतरू लागले आहेत आणि हा संताप आता वाढतच चालला आहे. शेतकरी बांधवांची पिके जळू नयेत आणि त्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शासनाने तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहेच परंतु या विषयावर देखील काही जण राजकीय पोळी भाजण्याचा उपद्व्याप करू लागले आहेत. शेतकरी बांधवांच्या संकटाचे देखील राजकारण होऊ लागले असून यामुळे मूळ विषय दुर्लक्षित होण्याचा धोका देखील व्यक्त करण्यात येत आहे. 


वीज उप केंद्रावरून खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे  पण यापुढेही  वीज बिल न भरलेल्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे काम सुरूच राहणार असून डी.पी नुसार वसुली मोहीम राबवली जाणार आहे. जे शेतकरी विजेचे बिल भरणार नाहीत त्यांचे डी.पी बंद करण्यात येणार आहेत. महावितरणकडून थकीत वीज बिल वसुलीची मोहीम अधिक गतिमान करण्यात येऊ लागली असून दहा हजार रुपये हप्त्यांप्रमाणे पाच टप्प्यात हे बिल भरून घेतले जात आहे. 


अचानकपणे कृषीपंपाचा वीज पुरवठा दिवसाचा १ तास तर रात्रीचा २ तास करण्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला आणि एवढ्या कमी काळात पिकांना पाणी कसे द्यायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर पडला. वेळ कमी केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणि संतप्त भरच पडली होती परंतु हा संताप पाहून या वेळेत वाढ करण्यात आली आहे. वीज उप केंद्राच्या ठिकाणावरून विद्युत पुरवठा पूर्ववत म्हणजे आठ तासांचा करण्यात आला आहे. पूर्ववत आठ तासांचा वेळ करण्यात आल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा नक्की मिळाला आहे परंतु वीज बिल थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी कसलाही दिलासा देण्यात आलेला नाही. 


महावितरणच्या वसुली मोहिमेला मात्र शेतकऱ्यांतून जोरदार विरोध होत असून हा विरोध संतापात बदलू लागला आहे. शिवारात राबणारे शेतकरी रस्त्यावर येऊन आंदोलने करू लागले आहेत त्यामुळे शेतकरी आणि महावितरण अधिकारी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसू लागला आहे. दोन्हीमध्ये समन्वय साधला जावा यासाठी वरिष्ठ पातळीवरून जलदगतीने तोडगा निघणे अत्यावश्यक बनले आहे.


  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !