पंढरपूर : शेतकरी आणि महावितरण यांच्यातील दुरावा वाढत चालला असून वीज तोडल्याच्या रागातून महावितरण कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून धमकी दिल्याचा एक गुन्हा ( Pandharpur Crime) पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
वीज बिल थकल्याने महावितरणकडून ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरु होते. कृषी पंपाचा वीज पुरवठा तोडला गेल्याने तर शेतकरी संतप्त होते आणि अनेक ठिकाणी महावितरण कार्यालय जाळण्याचा तसेच अधिकारी, कर्मचारी यांना मारहाण करण्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. महावितरण आणि ग्राहक यांच्यात यामुळे संघर्ष सुरु झाला असून शासनाने कृषी पंपाची वीज तोडण्याची मोहीम तात्पुरती थांबवली आहे पण ग्राहकांच्या मनात महावितरणबाबत असलेला असंतोष अजूनही खदखदताना दिसत आहे आणि यातूनच पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील एका घटनेबाबत (Wireman beaten for power outage ) पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महावितरणचे कर्मचारी सोमनाथ प्रकाश चौगुले यांनी या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादीनुसार, विजेचे बिल भरले नसल्यामुळे भाळवणी येथील नितीन विठ्ठल गायकवाड यांचा विद्युत पुरवठा तोडण्यात आला होता परंतु गायकवाड यांच्या मनात याबाबत राग होता. महावितरणच्या आदेशानुसार गायकवाड यांच्या घरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. या घटनेचा राग गायकवाड यांच्या मनात होता.
वीज तोडण्याची घटना साधारण एक महिन्यापूर्वी घडली होती, महावितरण कर्मचारी सोमनाथ चौगुले हे भाळवणी येथे खाजगी कामासाठी थांबले असताना नितीन गायकवाड यांनी त्यांना बोलावून घेतले. त्यानंतर गायकवाड यांनी शिवीगाळ आणि दमदाटी केली अशी फिर्याद चौगुले यांनी पोलिसात दिली आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी गायकवाड याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विवाहितेचा छळ !
मुलबाळ होत नाही तसेच माहेराहून दोन लाख रुपये आणावेत यासाठी विवाहित महिलेचा छळ केल्याप्रकरणी पंढरपूर शहर पोलिसात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्ञानेश्वर नगर, पंढरपूर येथील पायल उर्फ धनश्री संतोष कांबळे या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार २०१८ मध्ये पायलचा विवाह इंदापूर तालुक्यातील कळाशी येथील संतोष कांबळे याच्याशी झाला होता. संतोष हा पुण्यात एका कंपनीत नौकरी करीत असल्याची माहिती पायल यांच्या कुटुंबीयास लग्नापूर्वी दिली होती परंतु तो नौकरीस नसल्याचे नंतर निदर्शनाला आले. याबाबत विचारणा केल्यावर त्याने भांडण सुरु केले.
पती संतोष येताळा कांबळे याच्यासह सासू जिजाबाई कांबळे, सासरा येताळा नामदेव कांबळे (कळाशी, ता. इंदापूर) यांनी देखील पायल यांना त्रास दिला. दोन वर्षे झाली तरी मुलबाळ होत नाही यासाठी त्रास सुरु असताना घर बांधण्यासाठी माहेरवरून दोन लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावून त्रास देण्यात आला. शिवीगाळ करीत दमदाटी आणि मारहाण करण्यात आली तसेच पायल यांना घराच्या बाहेर देखील काढण्यात आले अशी फिर्याद दिल्यानंतर पती, सासू आणि सासरा यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
आठ जण निर्दोष मुक्त !
काठ्या आणि गजाने मारहाण केल्याच्या आरोपातून पुळूज येथील आठ जणांची अपिलात देखील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. अल्ताफ शेख, रियाज मुलाणी, आरिफ शेख, सादिक शेख, जावेद शेख, तौफिक शेख, खालिद शेख, तौफिक शेख यांनी काठ्या आणि गजाने मारहाण केल्याची फिर्याद दाखल झाली होती. या खटल्याची सुनावणी होऊन सर्व आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले होते परंतु सरकार पक्षाने या निकालावर अपील दाखल केले होते. जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या अपिलावर न्यायालयाचा निर्णय आला असून न्यायालयाने सर्वच्या सर्व आठ आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
हे वाचा :

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !