BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ मार्च, २०२२

कोरोनाच्या चौथ्या लाटेची चर्चा सुरु !

 



नवी दिल्ली : कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्यामुळे दिलासा मिळाला असतानाच पुन्हा चौथ्या लाटेची चर्चा सुरु झाली आहे त्यामुळे पुन्हा एकदा चिंता वाढणार असल्याचे दिसत आहे. 


कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात प्रचंड नुकसान झाले असून आर्थिक घडी विस्कटून टाकली आहे. कोरोनाच्या पहिल्या दोन लाटांनी सगळे काही उध्वस्त केले असताना कोरोनाची तिसरी लाट आली पण पहिल्या दोन लाटांच्या तुलनेत तिसरी लाट अधिक विध्वंसक ठरली नाही. तिसरी लाट येणार की नाही याबाबत मतमतांतरे होती. लाट येणार नसल्याचा दावा केला जात असतानाच तिच्या येण्याबाबत खात्रीही व्यक्त केली जात होती. अखेर तिसरी लाट आली पण वेगाने ती ओसरत निघाली. आता लवकरच कोरोनातून मुक्ती मिळेल अशी आशा असताना पुन्हा चौथ्या लाटेची चर्चा सुरु झाली आहे त्यामुळे चिंता वाढण्यास मदत होऊ लागली आहे. 


कोरोनाची तिसरी लाट ओसरत चालल्याने नियम आणि निर्बंधातून पूर्णपणे सुटका होईल ही आशा लागलेली आहे पण कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत संकेत देणे सुरु झाले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कानपूर (आयआयटी) च्या संशोधकांनी या लाटेबाबत अभ्यास केला आहे. त्यानुसार भारतात कोरोनाची चौथी लाट २२ जून च्या दरम्यान येऊ शकते असे म्हटले आहे. ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून ती अधिक वाढू शकते असे देखील सांगण्यात आले आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष अजून येण्याचे बाकी आहेत.   


सांख्यिकी मॉडेल्सच्या आधाराने संशोधकांनी हा अंदाज बांधलेला असून संभाव्य चौथी लाट जवळपास चार महिने टिकून राहील. या लाटेची तीव्रता ही कोरोना विषाणूच्या नव्या संभाव्य स्वरूपावर आणि लसीकरणाच्या स्थितीवर अवलंबून असणार आहे असे सांख्यिकी विभागाचे सबरा प्रसाद राजेशभाई, सुभ्रा शंकर धर यांच्या नेतृत्वाखालील अभ्यासात सुचविण्यात आलेले आहे.   आधीच्या लाटांचा अभ्यास केला असता लाट ९३६ दिवसात येईल, चौथी लाट २२ जूनपासून सुरु होईल आणि ती २३ ऑगष्टपर्यंत शिखरावर असेल. संभाव्य चौथी लाट २४ ऑक्टोबर २०२२ पर्यंत संपेल परंतु संभाव्य नवीन पॅटर्नचा एकूण मूल्यांकनावर खोलवर परिणाम होण्याची शक्यता नेहमीच असते. लाटेचा परिणाम कोरोना संसर्गाच्या प्रकारावर अवलंबून असणार आहे असे संशोधकांनी सांगितले. 


ओमीक्रॉन हा कोरोनाचा अंतिम प्रकार नसणार आहे, यानंतर देखील कोरोनाचे प्रकार येतच राहतील असे या आधीच जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. मे जून पर्यंत व्हायरसच्या पॅटर्नवर लक्ष ठेवावे लागणार असून काही विशेष आढळले नाही तर हा आजार स्थानिक म्हणून घोषित केला जाईल. चौथ्या लाटेचा प्रकार हा मलेरिया अथवा चिकुन गुनिया यांच्यासारखा असू शकतो, एखाद्या भागात काही दिवस प्रभाव पडतो परंतु नंतर सर्व काही व्यवस्थित होते असे देखील जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !