BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ मार्च, २०२२

अर्धा महाराष्ट्र कोरोना निर्बंधातून झाला मुक्त !

 




मुंबई : कोरोना निर्बंधाला कंटाळलेल्या जनतेला मोठा दिलासा मिळाला असून  अर्धा महाराष्ट्र कोरोना निर्बंधातून मुपूर्णपणे मुक्त करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून  नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ( corona restrictions lifted in fourteen districts )


कोरोनाच्या निर्बंधामुळे गेल्या दोन वर्षांपासून जनता अस्वस्थ आहे. कोरोनाच्या एकामागून एक तीन लाटा आल्याने नागरिकांना उसंत मिळालीच नाही आणि संचारबंदी, जमावबंदी यासह अनेक निर्बंध लागले त्यामुळे माणूस घरात कोंडला गेला आणि आर्थिक चक्रे कोरोनाच्या गाळात रुतून बसली. दुसरी लाट संपत आली तेंव्हा कोरोनाच्या संकटातून सुटका होतेय असे वाटत असतानाच तिसरी लाट आली आणि पुन्हा कोरोनाचे निर्बंध मानगुटीवर बसले. तिसरी लाट मात्र तुलनेने अधिक प्रभावी ठरली नाही आणि झपाट्याने तिला ओहोटी देखील लागली. त्यामुळे शासनाने आज राज्यातील १४ जिल्हे निर्बंधातून पूर्ण मुक्त केले असून या जिल्ह्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 


मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर या जिल्ह्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. राज्य शासनाने आज जाहीर केलेली नियमावली ४ मार्च पासून अमलात येणार आहे. या नियमानुसार चित्रपटगृहे, बार, रेस्टोरंट, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जिम, स्पा, स्विमिंग पूल, धार्मिक स्थळे, नाट्य गृहे, पर्यटन स्थळे, मनोरंजन पार्क अशी ठिकाणे आता पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. अन्य जिल्ह्यात मात्र पन्नास टक्के क्षमतेची अट तशीच ठेवण्यात आली आहे.  निर्बंध शिथिल केलेल्या १४ जिल्ह्यात खाजगी आणि सरकारी कार्यालयात शंभर टक्के उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. सर्व शाळा, महाविद्यालये यांचे वर्ग, अंगणवाडी, शिशुवर्ग  सुरु करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने हे वर्ग सुरु करण्यात येतील. 


कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा  पहिला डोस ९० टक्के, दुसरा डोस ७० टक्के, पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांहून कमी, ऑक्सिजन बेड ४० टक्क्यापेक्षा कमी असे निकष लावले असून हे निकष पूर्ण करणारे जिल्हे 'अ' श्रेणीत गणण्यात आले आहेत. या श्रेणीत सदर १४ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील शंभर टक्के निर्बंध हटविण्यात आले आहेत. (corona new guidlines maharashtra ) उर्वरित जिल्ह्यात मात्र पन्नास टक्क्यांची क्षमता कायम ठेवण्यात आली आहे.  कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झालेली असल्याने सार्वजनिक निर्बंध देखील लवकरच शिथिल करण्यात येतील असे शासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. 


निर्बंध उठविल्याने मोठा दिलासा मिळाला असून उरलेल्या जिल्ह्यातही लवकर मोकळा श्वास घ्यायला मिळावा अशी अपेक्षा आता व्यक्त होताना दिसत आहे. दोन वर्षे वेगवेगळे निर्बंध लोक पाळत आलेले असल्याने या निर्बंधातून सुटका व्हावी अशी अपेक्षा लोक व्यक्त करीत आहेत.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !