BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ फेब्रु, २०२२

मोटार सायकल आणि कारची अकारण तोडफोड !

 


पंढरपूर : मोटार सायकल तसेच चार चाकी वाहनांची तसेच बंगल्याच्या आवारात घुसून झाडांच्याकुंड्याची  अकारण तोडफोड करण्याचा विचित्र प्रकार पंढरपूर उपनगरात घडला असून याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.


उभ्या केलेल्या दुचाकी चोरून नेण्याच्या घटना घडतात हे सर्वाना माहित आहे. शिवाय कुठल्या वादातून कुणाच्या तरी दुचाकी अथवा चार चाकी गाड्यांची तोडफोड करण्याच्या घटनाही घडत असतात. पंढरपूर येथे मात्र एक वेगळाच प्रकार समोर आहे. काहीही कारण नसताना दुचाकी, चार चाकी वाहन आणि बंगल्याच्या आवारातील कुंड्या कुदळीने फोडून टाकण्याचा एक अनाकलनीय प्रकार समोर आला आहे. सदर प्रकार करणारा हा मनोरुग्ण असण्याची देखील शक्यता आहे. 


पंढरपूर येथील लिंक रोड परिसरात कर्मवीर औदुंबर पाटील नगर येथील नामदेव कागदे यांच्या बंगल्याच्या कंपाउंडच्या आत घुसलेल्या एका व्यक्तीने तेथील स्प्लेंडर गाडी खाली पाडून हातातील टिकाव मारून तोडफोड करत असल्याचे तसेच त्याने फुलझाडांच्या कुंड्या तोडून नुकसान केल्याची घटना घडली आहे. या परिसरात एक अनोळखी व्यक्ती हातात टिकाव घेऊन संशयास्पद रीतीने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी या भागात शोध घेतला असता त्यांना हा व्यक्ती कागदे यांच्या बंगल्याच्या आवारात असा प्रकार करीत असताना दिसून आला. 


या व्यक्तीने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एका मारुती कारचे देखील नुकसान केले आहे. त्यानंतर एका दुचाकीची तोडफोड करताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी सुरु केली. सदर व्यक्त हा मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अमित रवींद्र खडपकर असे त्याचे नाव असून त्याने वाहनांचे नुकसान कशासाठी केले हे मात्र समजू शकले नाही. उभ्या गाड्यांची कुणीतरी अकारण तोडफोड करतेय हे पाहून नागरिक देखील चक्रावून गेले. बंगल्याच्या आवारात लावलेली वाहनेही देखील असुरक्षित होऊ लागली असल्याने चिंता देखील व्यक्त होत आहे.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !