BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ फेब्रु, २०२२

भोसे येथील चोरीने हादरला पंढरपूर तालुका !

 



पंढरपूर : नागरिकांच्या मनावर चोरांच्या दहशतीचे ओझे असतानाच भोसे पाटी येथे झालेल्या मोठ्या चोरीने पुन्हा एकदा पंढरपूर तालुका हादरला असून जनतेच्या मनात असुरक्षिततेची भावना गडद होताना दिसत आहे. 


गेल्या काही महिन्यापासून पंढरपूर शहर आणि तालुक्यात चोरांनी भलताच धुमाकूळ घातला आहे. कुलूपबंद घरात घुसून चोरी होण्याचे अनेक प्रकार आजवर समोर आलेले आहेत पण आता चोरांनी आपला मोर्चा दुकानांकडे वळवला असल्याचे दिसत आहे.  ग्रामीण भागात बस स्थानक परिसरात तसेच महत्वाच्या रस्त्यालगत विविध व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत पण रात्रीत ही दुकाने सुरक्षित राहतील याची मात्र शाश्वती आता राहिली नाही. पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथे एका रात्रीत सहा दुकाने फोडल्याची घटना ताजी असतानाच आता भोसे पाटी येथे कापड दुकान फोडून सव्वा सात लाखांची चोरी झाली आहे.  


पंढरपूर - करकंब रस्त्यावर भोसे पाटी येथे सिद्धेश्वर कोरके यांचे हर्षद कलेक्शन हे कापड दुकान अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळी फोडून सव्वा सात लाखांची चोरी केली आहे. ७ लाख २० हजार ६५० रुपयांचा माल या दुकानातून चोरून नेण्यात आला आहे. दुकानाचा पत्रा मागील बाजूने उचकटून आत शिरण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने चक्क खालच्या बाजूची जमीन उकरण्यात आली. एक प्रकारे बोगदा तयार करून आत प्रवेश केला लाखो रुपयांच्या कपड्यांची चोरी करण्यात आली.  ही चोरी झाल्याचे सकाळी लक्षात आल्यानंतर कोरके यांनी करकंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या चोरीने परिसराला चांगलाच हादरा बसला असून नागरिकांत असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याचे दिसत आहे.    


पंढरपूर तालुक्यात सुस्ते येथे नुकतीच एका रात्रीत चोरट्यांनी सहा दुकाने फोडली होती.  या चोरीसाठी गॅस कटरचा वापर करण्यात आला असून बाजूचे पत्रे उचकटून चोरी करण्यात आली होती. सुस्ते येथे वेगवेगळ्या प्रकारची दुकाने फोडण्यात आली आहेत.  कृषी केंद्र, मोबाईल शॉपी, कापडाचे दुकान, हार्डवेअरचे दुकान, इलेक्ट्रॉनिक दुकन अशी दुकाने फोडून सुस्ते परिसरात चोरट्यांनी घबराट निर्माण केली. पंढरपूर- सांगोला रस्त्यावरील बामणी येथेही एकाच रात्री दोन व्यापार संकुलातील आठ दुकाने फोडण्यात आली होती.   


रात्रीच्या वेळी बंद दुकाने फोडली जाऊ लागल्याने दुकानदार पुरते धास्तावून गेले आहेत. सुस्ते येथे यापूर्वी देखील अशाच प्रकारच्या चोऱ्या झाल्या आहेत. पंढरपूर शहर, उपनगरे आणि तालुक्याचा ग्रामीण भाग येथे सतत चोरी होण्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे चिंता व्यक्त होऊ लागली आहे. काही करून या चोरांचा बंदोबस्त होण्याची गरज असल्याचे मत ग्रामीण भागातून व्यक्त होऊ लागले आहे. पोलीस एकेका चोरीचा छडा लावत असताना नवनव्या घटना घडणे देखील सुरूच असल्याचे दिसत आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !