इंदापूर : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन उद्धव ठाकरे यांना दोन वर्षे होऊन गेली तरीही राष्ट्रवादीचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्या डोक्यात अजूनही मुख्यमंत्री पदावर भाजपचे देवेंद्र फडणवीस हेच असल्याचे जाहीरपणे समोर आले आणि मग चर्चाही सुरु झाली.
राज्यात भाजपचे सरकार गेले आणि महाविकास आघाडीचे सरकार आले. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशा तीन राजकीय पक्षांनी एकत्र येत हे सरकार स्थापन केले आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचे अजित पवार हे उप मुख्यमंत्री बनले. या घटनेला दोन वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. या सरकारमध्ये इंदापूरचे दत्तामामा भरणे हे देखील एक मंत्री आहेत आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद त्यांच्याकडेच आहे. असे असले तरी दत्तामामा अजूनही भाजप सरकारमध्येच रमलेले दिसले. अजूनही मुख्यमंत्री पदावर भाजपचे देवेंद्र फडणवीस हेच आहेत हे काही त्यांच्या डोक्यातून गेलेले दिसत नाही आणि उद्धव ठाकरे हे त्यांच्या लक्षात राहिलेले दिसत नाही. इंदापूर येथील एका जाहीर कार्यक्रमात हा प्रकार जाहीरपणे समोर आला.
महाविकास आघाडीतील घटक पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना आपल्याच सरकारमधील मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या नावाचा विसर पडला आणि त्यांनी जाहीरपणे बोलताना मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस असा उल्लेख केला. इंदापूर येथे एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात भरणे जाहीरपणे बोलत होते. यावेळी पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी आमदार जोगेंद्र कवाडे हे देखील या कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी भरणे मामा बोलताना चुकले आणि एकच हशा पिकला!
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे बोलत असताना त्यांनी चुकून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस असा उल्लेख केला. उपस्थितात चुळबुळ सुरु झाली तर काही जण हसत दत्तामामा यांच्याकडे पाहत राहिले पण दत्तामामा यांच्या काही ही चूक लक्षात आली नाही. व्यासपीठावर असलेल्या माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ यांनी ही चूक भरणे मामांच्या लक्षात आणून दिली तेंव्हा कुठे मामानी आपली चूक सुधारली. पण तोपर्यंत उपस्थितांच्या हसून हसून पुरेवाट झाली होती. काहीशी खळबळ उडाल्याचे देखील यावेळी पाहायला मिळाले. लोकांचे हसणे थांबल्यावर दत्तामामा भरणे म्हणाले, 'डोक्यात सतत खूप विचार असल्यामुळे होतं असं कधीकधी !' दत्तामामा यांनी वेळ मारून नेली खरी पण अशा प्रसंगाची चर्चा तर होणारच !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !