BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ फेब्रु, २०२२

एका पत्नीवर तिघांचा पती असल्याचा दावा !




बीड : सानुग्रह अनुदानाच्या लोभापोटी एका मयत महिलेवर तिघांनी आपणच तिचा पती असल्याचा दावा केल्याने खळबळ उडाली असून पैशापुढे माणुसकीचे किंमत शून्य असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. 


जिवंत असताना कुणी कुणाला थोडीशी मदत करायला तयार होत नाही पण कुणाच्या मृत्युनंतर पैशाकडे पाहून नात्याचा हक्क जोडण्याच्या अमानवी प्रकार केला जातो. अशा प्रकारची उदाहरणे किल्लारी भूकंपाच्या वेळेस समोर आली होती. भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या एका महिलेच्या अंगावर मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने होते आणि या महिलेची ओळख पटत नव्हती. त्यावेळेस आपणच या महिलेचे पती असल्याचा दावा करणारे दोघे जण पुढे आले होते आणि यातील खरा पती निवडताना पोलिसांची दमछाक झाली होती. असाच काहीसा प्रकार आता बीड येथे समोर आला असून कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या एका महिलेचा पती असल्याचा दावा तिघांनी केला आहे. 


कोरोनाने मृत्यू झाला असल्यास शासनाकडून ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. हे अनुदान लाटण्यासाठीही अनेक गैरप्रकार होत असल्याचे या आधीच समोर आलेले आहे.  कोरोनामुळे निधन झाले नसतानाही शासनाचे अनुदान मिळावे म्हणून अनेकांनी अर्ज केले असल्याचे उघडकीस आले आहे. असे प्रकार घडू लागल्याने प्रशासनाची मोठी अडचण होऊ लागली आहे. खोटे प्रकार घडत असल्याचे उघड होऊ लागल्यामुळे प्रशासन बारकाईने चोकशी केली जात आहे तरीही हे प्रकार थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. त्यातच बीड मधील एका प्रकाराने अनेकांना धक्का बसला असून प्रशासन देखील चक्रावून गेले आहे. कोरोनाने मयत झालेल्या एका महिलेचा पती असल्याचे सांगत तिघांनी या अनुदानाची मागणी केली आहे.
 

कोरोनामुळे एका महिलेचे निधन झाले होते आणि या महिलेचा पती असल्याचा दावा करीत तिघांनी अनुदान मिळण्यासाठी प्रशासनाकडे अनुदानाची मागणी केली आहे. हा प्रकार पाहून प्रशासन देखील चक्रावले आहे. एकाच महिलेचा पती म्हणून चक्क तिघांनी अनुदानासाठी अर्ज केले आहेत पण नावात असलेला फरक आणि नाते जुळत नसल्याचे कारण देत प्रशासनाने हे अर्ज फेटाळले आहेत. या घटनेमुळे प्रशासन अधिक सतर्क झाले असून प्रत्येक अर्जाची बारकाईने छाननी आणि तपासणी केली जात आहे. 


बीड येथे एकूण ३ हजार ३२६ अर्ज प्राप्त झाले आहेत परंतु यातील २ हजार ११७ अर्जच बरोबर आहेत. एका मृत महिलेवर पती म्हणून तिघांनी दावा केला असल्याने यातील एक तरी खरा पती असावा असे वाटणे स्वाभाविक आहे पण हे तिघेही भामटे असल्याचेच दिसून आले आहे. तिघांचेही अर्ज प्रशासनाने फेटाळून लावल्याने यातील एक व्यक्तीही या महिलेचा पती नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. या घटनेने दुनियेचा आणखी एक वेगळा रंग दाखवला आहे हे मात्र नक्की !

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !