बिजवडी : निवडणुकीत आपला पाडाव करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी मतदारसंघातील २२ नेते कोट्यावधी रुपयांना विकत घेतले होते असा आरोप भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.
सातारा जिल्ह्यात दिवड येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि तालुक्यातील भाजपच्या नूतन पदाधिकारी यांच्या सत्काराच्या समारंभात बोलताना आमदार जयकुमार गोरे राष्ट्रवादी काँग्रेससह शरद पवार यांच्यावर अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, ' बारामती, फलटण, कऱ्हाड, सातारा येथून राष्ट्रवादीकडून आपल्यावर मिसाईल मारा करण्यात येतो पण आपल्याकडेही त्यांच्या सगळ्या मिसाईलला पुरून उरणारे, माझ्यावर विश्वास असणाऱ्या जनतेचे हुकुमी मिसाईल आहे.' त्यानंतर जयकुमार गोरे यांनी थेट शरद पवार यांच्यावर आरोप केला आणि खळबळ उडवून दिली.
शरद पवार यांच्या मुंबई येथील 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी एक बैठक झाली होती. या बैठकीत शरद पवार यांनी आपणास निवडणुकीत पाडण्यासाठी आदेश दिला होता. 'माणच्या गोरेनी मला माढ्यातून घालवून देशात माझी अब्रू घालवली आहे, काही करून सगळे एकत्र या आणि त्यांना पाडा' असा आदेश शरद पवार यांनी दिला होता. असे सांगतानाच त्यांनी 'मतदारसंघातील २२ नेते कोट्यावधी रुपयांना विकत घेण्यात आले होते' असा थेट आरोप आ. जयकुमार गोरे यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. जयकुमार गोरे यांच्या अशा आरोपामुळे राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरु झाली आहे.
'सिल्व्हर ओक' वरील या आदेशानंतर आदेशासह मिळालेले पैसे घेऊन सगळी फौज आपल्याविरोधात लढली, जातीपातीचे राजकारण आणि पैशांचा पूर असला तरी त्यांना हिसका दाखवला. निवडणुकीत आपला पराभव करण्याची संधी हुकली असल्याने यापुढे पंधरा वर्षे तरी 'त्यांनी' आमदारकीची स्वप्ने पाहू नयेत असे देखील गोरे यावेळी बोलताना म्हणाले आहेत.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी 'माण तालुक्यातील ओद्योगिक वसाहत पळविण्याचा कट रचणाऱ्यानी सावध असावे. आ. गोरे यांनी आजवर अनेक कट उधळून लावले आहेत त्यामुळे हा कट देखील यशस्वी होऊ देणार नाहीत' असे सांगून माणवासियांना निश्चिंत राहण्याचे आवाहन केले.
.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !