सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेल्या तिरडी मोर्चात आज पोलीस आणि शेतकरी कार्यकर्ते यांच्यात जोरदार राडा झाला आणि भर रस्त्यात धक्काबुक्की होण्याचा प्रसंग आला.
साखर कारखान्यांकडून मागील वर्षाची ऊसाची देणी दिली गेली नाहीत आणि वीज पुरवठा खंडित करण्याच्या प्रकारामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक आहे. याच कारणासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरडी मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी पोलीस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात भर रस्त्यावर जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. स्वाभिमानीकडून पुतळा काढून घेण्याच्या प्रकारामुळे मोर्चात ठिणगी पडली आणि यातूनच संघटना कार्यकर्ते आणि पोलीस यांच्या धक्काबुक्की आणि शाब्दिक चकमक झाली.
शेतकऱ्याची एफआरपी रक्कम एकरकमी देण्यात यावी आणि बळजबरीने वीज पुरवठा खंडित करणे बंद करून दिवसा दहा तासांची वीज देण्यात यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरडी मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी स्वभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी, कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात राडा झाला. साखर कारखानदाराचा प्रतीकात्मक पुतळा स्वभिमानीने तयार केला होता तो काढून घेण्याच्या प्रयत्नात पोलिसांशी धक्काबुक्की झाली. यामुळे भर रस्त्यावर काही काळ तणावाचे वातावरण झाले होते.
सदर प्रकारामुळे राजू शेट्टी प्रचंड संतापले होते. 'सरकारी रक्षक भक्षक बनले आहेत आणि साखर कारखानदार हे पालकमंत्री यांच्या आश्रयाला आलेले आहेत. कारखानदाराचे प्रतीकात्मक पुतळे नेत असताना त्यांची विटंबना करण्यात आली असून याला पोलीसच जबाबदार आहेत' असे राजू शेट्टी म्हणाले. शेतकऱ्यांच्या उसाचा बिलाबाबत बोलताना शेट्टी यांनी एकरकमीच एफआरपी घेणार असल्याचे निक्षून सांगितले आहे. पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखानदारांचे टोळके निर्माण झालेले असून त्यांनी शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा घातला असल्याचेही शेट्टी यावेळी म्हणाले आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आजच्या मोर्चात झालेल्या धक्काबुक्कीचीच अधिक चर्चा आज झाली आणि स्वाभिमानी कार्यकर्ते देखील आज प्रचंड संतापलेले दिसत होते. पुतळे काढून घेण्याच्या पोलिसांच्या प्रयत्नामुळे या तिरडी मोर्चात मोठा राडा झाल्याचे पहायला मिळाले आहे. या घटनेनंतर देखील राजू शेट्टी आणि कार्यकर्ते प्रचंड संतापलेले होते. त्यांनी पोलीस आणि पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर अत्यंत आक्रमकपणे टीकेचा प्रहार केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !