जालना : तेरा दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झालेले जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिकारी अखेर सातारा जिल्ह्यात सापडले असून त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाल्याचे समोर आले आहे.
एखादी व्यक्ती हरवली अथवा बेपत्ता झाली तर सामान्य माणूस पोलिसांची मदत घेतो पण जालना येथे वेगळीच घटना समोर आली आहे. पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी संग्राम ताटे हे अचानक बेपत्ता असल्याचे दिसून आले. २ जानेवारीच्या सायंकाळपासून हे अधिकारी गायब झाले आणि या घटनेने जालना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. एक पोलीस अधिकारी अचानक बेपत्ता कसा होऊ शकतो याचेच कोडे पोलिसांच्या समोर देखील आहे. पोलीस अधिकारी संग्राम ताटे यांच्या पत्नीनेच याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आणि पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला होता.
ताटे यांच्या पत्नीने देलेल्या माहितीनुसार संग्राम ताटे हे २ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मित्राला भेटायला जातो म्हणून घरातून बाहेर पडले. बाहेर पडताना त्यांनी मोबाईल, गाडी हे सोबत काहीच नेले नाही. मित्राला भेटायला जातो म्हणून ते यशवंतनगर येथील घरातून बाहेर पडले ते परतलेच नाहीत. अशा प्रकारे अचानक त्यांच्या बेपत्ता होण्याने रहस्य वाढले होते. जालना पोलिसांनी लगेच त्यांचा शोध सुरु केला होता. पोलीस अधिकारी असूनही त्यांनी बाहेर जाताना गाडी आणि मोबाईल कसा नेला नाही ? हा प्रश्न कोड्यात टाकणारा आणि काही प्रश्न निर्माण करणारा आहे.
औरंगाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक यांनीही संग्राम ताटे यांची जालना शहरात दिवसभर शोधाशोध केली परंतु त्यांचा काहीच ठावठिकाणा लागला नाही. त्याच्या अशा बेपत्ता होण्याने पोलीस दलात, विशेषत: लाचलुचपत प्रतिबंधक विभागात खळबळ उडाली होती तसेच चिंताही व्यक्त होत राहिली. विशेष म्हणजे बेपत्ता संग्राम ताटे यांना त्याच दिवशी पोलीस निरीक्षक पदावर बढती मिळाली असून त्यांची बढतीवर कोकण विभागात बदली झाली आहे. अशा वेळी त्यांचे बेपत्ता होणे हे सगळ्यांचा कोड्यात टाकणारे आणि चिंता वाढविणारे ठरले होते परंतु सुदैवाने त्यांचा शोध लागला आहे.
संग्राम ताटे हे बेपत्ता झाल्यानंतर १३ दिवसांनी त्यांचा शोध लागला आहे. शोध घेणाऱ्या पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही पण हे अधिकारी मात्र सापडले आहेत. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालूक्यातील शिरवळ येथे ते बेशुद्धावस्थेत आढळून आले असून त्यांना कराड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एका व्यक्तीस कुणीतरी बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसले. सदर व्यक्तीने या बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी पाहणी केली असता त्या व्यक्तीच्या हातावर एक मोबाईल क्रमांक लिहिलेला असल्याचे दिसले. त्यानुसार त्या क्रमांकावर संपर्क साधला असता हा क्रमांक बेपत्ता पोलीस अधिकारी संग्राम ताटे यांच्या पत्नीचा असल्याचे दिसून आले. त्यामुळे बेशुद्धावस्थेत असलेली व्यक्ती ही १३ दिवसांपूर्वी जालना येथून बेपत्ता झालेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अधिकारी संग्राम ताटे असल्याचे लक्षात आले.
दरम्यान संग्राम ताटे यांच्या पत्नीने तातडीने हालचाल केली आणि कराड येथील आपल्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. संग्राम ताटे यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना कराड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस विभागात अधिकारी पदावर असणारे संग्राम ताटे असे अचानक घरातून बाहेर कसे पडले ? ते जालना येथून सातारा जिल्ह्यापर्यंत कसे आणि कशासाठी पोहोचले ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत असून ताटे यांची प्रकृती व्यवस्थित झाल्यावरच याची उत्तरे मिळण्याशी शक्यता आहे. तेरा दिवसापासून बेपत्ता असलेले आणि कसलाही शोध लागत नसलेले अधिकारी सुदैवाने सापडले आहेत हे देखील दिलासा देणारे ठरले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !