मंगळवेढा : ज्ञानदानाचे आणि भावी पिढी घडविण्याची जबाबदारी असलेल्या आणखी एका 'जुगारी मास्तर' ला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आणि शिक्षण विभाग कुठल्या दिशेने निघालेला आहे हे दिसून आले.
शिक्षक ही एक नोकरी नसून पवित्र जबाबदारी आहे, देशाची उद्याची पिढी कशी असावी याला आकार देणारा शिक्षक असून शिक्षकाचे स्थान समाजांत अगदी वरचे आहे. अलीकडे अनेक शिक्षकांच्या कृतीमुळे हा पेशा काही अंशी अडचणीत येताना दिसत आहे. समजात एक पवित्र स्थान असलेले शिक्षक अलीकडे नको त्या ठिकाणीच दिसू लागले आहेत. आजवर अनेक शिक्षक जुगार अड्ड्यावर पोलिसांना आढळून आलेले आहेत. मंगळवेढा तालुक्यात तर हा प्रकार अधिक असून दोन दिवसांपूर्वीच कचरेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक जुगार खेळताना रंगेहात पकडले गेले होते.
मंगळवेढा पोलिसांनी अवैध व्यवसायाला लगाम घालण्याची एक मोहीमच हाती घेतली आहे. तालुक्यातील नंदेश्वर येथे आज एका जुगार अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत १ लाख ३७ हजार ५०५ रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. नंदेश्वर येथील जय भवानी चौकात असलेल्या राजू गरंडे याच्या खोलीत जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता मिळालेली बातमी सत्य निघाली. यावेळी एका माध्यमिक शिक्षकासह काही जण जुगार खेळताना पोलिसांना आढळून आले.
राजू भगवान गरंडे, भानुदास लक्ष्मण कसबे, सुदर्शन नामदेव रामागुडे, महादेव सुखदेव चौगुले, अंकुश सुखदेव चौगुले, बाबासाहेब श्रीरंग क्षीरसागर, बजरंग धोंडीबा चौगुले, संभाजी बबन खापे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडील २६ हजार ५०० रुपये रोख, ३९ हजार ५०० रुपयांचे मोबाईल आणि तीन दुचाकी असा ऐवज पोलिसांनी जप्त केला आणि जुगारी मंडळींची वरात पोलीस ठाण्यात आणली. मंगळवेढा तालुक्यात जुगारी मंडळींची संख्या मोठी असून नेहमीच येथे अशा धाडीत अनेक जणांचे पितळ उघडे पडते पण जुगार अड्ड्यापेक्षा या धाडीत सापडत असलेल्या शिक्षक मंडळींचीच अधिक चर्चा होत असते.
दोन दिवसांपूर्वी कचरेवाडी येथे पडलेल्या छाप्यात एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक जुगार खेळताना सापडले. या गुरुजींसह ९ जणांच्या विरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या शिक्षकाची चर्चा अजून गावोगावी सुरु आहे तोच आज आणखी एक माध्यमिक शिक्षक जुगार खेळताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्यामुळे शिक्षकांची चर्चा वेगळ्या पद्धतीने होऊ लागली असून चांगल्या आणि सभ्य शिक्षकांना देखील अशामुळे मान खाली घालण्याची वेळ येऊ लागली आहे. जुगार खेळताना अनेक जण सापडतात पण चर्चा मात्र शिक्षक मंडळींची होते. शिक्षकाकडे पाहण्याचा दृष्टीकोन अजूनही चांगला असल्यामुळे आणि भावी पिढी घडविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असल्यामुळे अशी चर्चा होणे स्वाभाविक मानले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !