BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ फेब्रु, २०२२

योग्य मोबदल्यासाठी शेतकऱ्याने शेतात रचली आपलीच चिता !

 



अकलूज : जमीनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याने माळीनगर येथील एका शेतकऱ्याने स्वतःसाठी स्वतःच चिता रचली आणि पेटवून घेण्याचा इशारा दिला त्यामुळे अधिकाऱ्यांना देखील घाम फुटला आहे. 


विविध कारणासाठी शेतकऱ्यांच्या जमीनी शासन संपादित करते पण त्याचा योग्य मोबदला दिला जात नाही अशा तक्रारी नेहमीच असतात. बहुसंख्य शेतकरी मिळेल तो मोबदला घेऊन नाईलाजाने गप्प बसतात पण माळीनगर येथील नवनाथ बधे या शेतकऱ्याने प्रशासनालाच घाम फोडला आहे. टेंभुर्णी - अकलूज महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे आणि त्यासाठी शेतजमिनी अधिगृहित करण्यात आल्या. पण जमिनीचा देण्यात येत असलेला मोबदला शेतकरी बांधवाना मान्य नाही. यातूनच या शेतकऱ्याने आपलीच चिता रचून पेटवून घेण्याचा इशारा प्रशासनाला दिला आणि प्रशासनाची पंचाईत करून टाकली आहे. 


शेतकरी नवनाथ बधे यांची जमीन अकलूज - टेंभुर्णी मार्गासाठी संपादित करण्यात आली आहे. इतर शेतकऱ्याप्रमाणे त्यानाही त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे त्यांनी सतत प्रशासनाकडे पाठपुरावा केला, निवेदने देऊन योग्य मोबदला मिळण्याची मागणीही केली पण त्यांची कुणी दखल घेतली नाही. अखेर ते वैतागून गेले आणि त्यांनी आपल्याच शेतात चिता रचली, त्याच चितेवर ते बसले आणि योग्य मोबदला नाही मिळाला तर याच चितेवर पेटवून घेईल असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. बधे यांची २२ गुंठे जमीन संपादित करण्यात आली असून अधिग्रहित करताना चुकीची पद्धंत अवलंबली असल्यचे त्यांचे म्हणणे आहे. जमीनीसाठी निश्चित करण्यात आलेला मोबदला अत्यंत कमी आहे असे त्यांचे मत आहे. 


आज प्रशासकीय अधिकारी पोलिसांना घेवून त्यांच्या शेतात आले पण बधे यांनी सरणावर बसून पेटवून घेण्याचा इशारा दिला. योग्य मोबदला द्या नाहीतर चितेवर पेटवून घेईन असे त्यांनी अधिकारी यांना सांगितले तेंव्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांची बोलती बंद झाली. योग्य मोबदल्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना प्रखर विरोध केला. दोन दिवसात योग्य मोबदला नाही मिळाला तर याच चितेवर पेटवून घेण्याचा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. नवनाथ बधे हे शेतकरी गेल्या दोन दिवसांपासून याच सरणावर बसून असून जेवण देखील तेथेच करीत आहेत. या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची जिल्हाभर चर्चा सुरु झाली आहे.  


प्रशासकीय अधिकारी कायद्याचा आधार घेत शेतकरी बांधवाला आणि त्यांच्या विरोधाला दाबून टाकण्याचा प्रयत्न करीत असतात. सामान्य शेतकरी शासन आणि प्रशासन यांच्यापुढे हतबल असतो. त्याने कितीही आक्रोश केला तरी तो कुणाच्याच कानापर्यंत पोहोचत नाही आणि मग शेतकरी हतबल होतो. त्याची काळी आई त्याच्याकडून हिसकावून घेतली जात असताना ते सहन करण्याच्या पलीकडे शेतकरी गेलेला असतो. आवाज दाबून टाकण्याची सवय असलेल्या प्रशासनाला आज मात्र आपलाच घाम पुसावा लागला आणि आल्या पावली परत जावे लागले.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !