BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ फेब्रु, २०२२

सोलापूर जिल्हा दुध संघाची निवडणूक जाणार उच्च न्यायालयात !

  




सोलापूर : सोलापूर जिल्हा दुध संघाची  निवडणूक आता उच्च न्यायालयात जाणार असून अपील फेटाळल्यानंतर या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याचे माजी आमदार दिलीप माने यांनी सांगितले आहे.  


जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाचे केंद्र असलेल्या सोलापूर दुध संघाच्या निवडणुकीत निवडणुकीच्या आधीच दिग्गजांना धक्का बसला असून माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्यासह २६ जणांचे अर्ज छाननीत बाद ठरले आहेत. यावर माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्यासह दहा जण विभागीय दुग्ध उप निबंधक यांच्याकडे अपील केले होते पण हे अपील देखील फेटाळण्यात आले आहे. त्यामुळे आता दिलीप माने यांनी उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील ही निवडणूक आता उच्च न्यायालयात पोहोचणार आहे हे निश्चित झाले आहे.  


सोलापूर जिल्हा दुध संघ हा जिल्ह्यातील राजकारणातील एक महत्वाचे केंद्र आहे त्यामुळे दुध संघावर जाण्यासाठी सर्वच बड्या राजकीय नेत्यांचा प्रयत्न असतो. सोलापूर जिल्हा दुध संघाची निवडणूक गेल्या काही दिवसांपासून वाजत गाजत आहे आणि या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील दिग्गज मंडळीनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची छाननी करण्यात आली तेंव्हा बड्या बड्या मंडळीना मोठा धक्का सहन करावा लागला आहे. जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार दिलीप माने, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, संचालक दीपक माळी, सिद्धेश्वर आवताडे, प्रभाकर कोरे यांच्यासह २६ जणांचे अर्ज आज छाननीत बाद ठरले आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या आधीच या नेत्यांना शस्त्र खाली ठेवावी लागली असे वाटत असतानाच ही लढाई आता उच्च न्यायालयाच्या दरबारात पोहोचणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.   


निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली यात २६ जणांचे अर्ज बाद ठरले. थकबाकीदार असणे, जातीचे प्रमाणपत्र नसणे, नियमानुसार दुध पुरवठा न करणे अशा कारणामुळे अर्ज बाद ठरविण्यात आले आहेत. अर्ज बाद झालेल्या उमेदवारांना तीन दिवसात अपील करता येते. अपिलात त्यांचे अर्ज मंजूर झाले तर त्यांना निवडणूक लढविता येऊ शकत होती परंतु अपिलात देखील हे अर्ज बाद ठरण्यावर शिक्कामोर्तब झाल्याने बड्या नेत्यांना मोठा राजकीय धक्का बसलेला आहे. अपील फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात दाद मागितली जाणार असून त्यावर काय निर्णय येतोय यावर या निवडणुकीची रंजकता अधिक वाढणार आहे. 


सोलापूर जिल्हा दुध संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भोळे यांनी २६ उमेदवारांचे अर्ज बाद ठरवले होते त्यावर विभागीय दुग्ध उप निबंधक यांनी सुनावणी करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेला निर्णय कायम ठेवला आहे. आता येत्या १५ फेब्रुवारी रोजी या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. परंतु त्या आधीच हा विषय उच्च न्यायालयात निघाला असून अर्ज बाद केल्याप्रकरणी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे माजी आमदार दिलीप माने यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सोलापूरची ही निवडणूक उच्च न्यायालयापर्यंत वाजणार, गाजणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !