सोलापूर : सोलापूर येथील शासकीय रुग्णालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला असून वीस वर्षीय तरुणाच्या मृतदेहाला मुंग्या लागल्याचे नातेवाईकांना आढळून आले आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आहे.
सोलापूर शासकीय रुग्णालयात रुग्णांची हेळसांड होत असल्याबाबत नेहमीच चर्चा आणि संतप्त प्रतिक्रिया उमटत असतात पण गरीब रुग्णांना येथे उपचार घेण्याशिवाय पर्याय नसतो. खाजगी रुग्णालयातील प्रचंड महागडे उपचार गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेर असतात आणि सामान्य गरीब रुग्णावर उपचार होण्यासाठी जिल्हा पातळीपासून ग्रामीण भागापर्यंत सरकारी दवाखाने कार्यरत असतात. ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयांच्याबाबत तर नाराजीच असते पण आता जिल्हा रुग्णालयात देखील एक वेगळाच प्रकार उघडकीस आला असून मृतदेहाची विटंबना तर झालीच आहे पण माणुसकीला काळीमा फासणारी देखील ही घटना आहे.
बुधवार पेठ येथे राहणारा वीस वर्षाचा तरुण राकेश मोरे हा गेल्या चार दिवसापासून सोलापूर येथील सिव्हील हॉस्पिटल येथे उपचार घेत होता. त्याच्यावर टी.बी. चे उपचार सुरु होते. काल राकेशचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाने राकेशच्या नातेवाईकांना दिली. त्यानुसार नातेवाईक राकेशचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेले असता नातेवाईकांना जबर धक्का बसला. मयत राकेशच्या संपूर्ण शरीराला मुंग्या लागलेल्या होत्या. एवढेच नव्हे तर त्याला लावण्यात आलेल्या मास्कला देखील मुंग्यांनी घेरले होते. मृतदेहाच्या सर्वांगाचा ताबा मुंग्यांनी घेतलेला पाहून नातेवाईकांना धक्का बसला.
शासकीय रुग्णालयात मृतदेहाची अशी विटंबना आणि माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक बाब नातेवाईक आपल्या डोळ्यांनी पाहत होते. वीस वर्षांचा तरुण आजाराने मृत्युमुखी पडल्याचे दु:ख असताना त्या मृतदेहाची शासकीय रुग्णालयातच अशी विटंबना सुरु होती त्यामुळे नातेवाईकांचा संताप अनावर झाला आहे. नातेवाइकानी संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एवढी मोठी अमानवी घटना घडल्यानंतर हॉस्पिटल प्रशासन काय खुलासा करतेय आणि हॉस्पिटलच्या विरोधात काय कारवाई केली जातेय हेच आता पाहावे लागणार आहे.
सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात घडलेला हा प्रकार काही समाजसेवकांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या कानावर घातला असल्याची देखील माहिती मिळत आहे. प्रचंड अमानवी आणि धक्कादायक बाब उजेडात आल्याने जनमानसात देखील खळबळ उडाली असून आश्चर्य व्यक्त करण्यात येऊ लागले आहे. केवळ संबंधित डॉक्टरच नव्हे तर रुग्णालय प्रशासनावरच कडक कारवाई व्हायला हवी अशी मागणी सामान्य नागरीकातून देखील होताना दिसत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !