पालघर : शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची आणि पावणे दोन कोटी रुपयांचा दंड अशी जबर शिक्षा पालघर न्यायालयाने ठोठावली आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील शिक्षण राज्य मंत्री बच्चू कडू यांना नुकतीच दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती. या घटनेने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडालेली असतानाच आता शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्षाचा तुरुंगवास आणि १ कोटी ७५ लाखांचा दंड अशी कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे. पालघर जिल्हा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाने हे शिक्षा ठोठावली आहे. साहजिकच या शिक्षेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ तर शिवसेनेच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
एका जागेच्या व्यवहारातून गावित यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. खासदार राजेंद्र गावित यांनी व्यावसायिक चिराग कीर्ती बाफना यांना जागेच्या व्यवहारातून दीड कोटी रुपयांचे चेक दिलेले होते परंतु हे चेक बाउंस झाले आणि बाफना यांना ही रक्कम मिळू शकली नाही. गावित यांच्या विरोधात पालघर न्यायालयात खाजगी दावा दाखल करण्यात आला होता. यावर सुनावणी होवून खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्षांच्या कारावासासह पावणे दोन कोटींचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. गावित यांना अपिलात जाण्याची मुभा देण्यात आली आहे.
गावित आणि बाफना यांच्यात २०१९ मध्ये न्यायालयासमोर तडजोड करण्यात आली होती. त्यानुसार रक्कम देण्याबाबत करार झाला होता. राजेंद्र गावित यांनी अडीच कोटी रकमेचे ७ धनादेश दिले त्यापैकी १ कोटींचे धनादेश वठले होते. बाकेचे २५ लाखांचे ६ धनादेश बाउंस झाले त्यामुळे बाफना यांनी अर्ज दाखल केला आणि या दाव्याचा निकाल न्यायालयाने दिला. त्यानुसार ही कठोर शिक्षा गाविताना सुनावण्यात आली.
प्रहार संघटनेचे आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना देखील दोन महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांनी निवडणुकीत प्रतिज्ञापत्र सदर करताना घराची माहिती लपवली होती असा त्यांच्यावर आरोप होता. हा आरोप न्यायालयात सिद्ध झाल्याने त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे परंतु गावित यांना झालेली शिक्षा ही व्यवहारातून झालेली आहे. खासदार राजेंद्र गावित हे या निर्णयाविरुद्ध अपिलात जाऊन दाद मागणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !