BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ फेब्रु, २०२२

कोरोना संपल्याची केवळ अफवा, WHO चा इशारा !


मुंबई : कोरोनाची तिसरी लाट येत्या काही दिवसात संपणार असल्याचे दावे केले जात असतानाच कोरोना संपल्याची केवळ अफवा असल्याचे सांगत जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याचा इशारा दिलेला आहे.


गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची तिसरी लाट परतीच्या प्रवासाला लागल्याचे दिसत आहे. रोजच्या रुग्णांच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट देखील होऊ लागले आहे. त्यातच मास्क पासून सुटका होण्याची आणि निर्बंध लवकरच कमी करण्याची चर्चाही होऊ लागली आहे. कोरोना परत फिरल्यामुळे दिलासा लाभला असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने ( WHO ) मात्र कोरोना संपल्याची केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे त्यामुळे पुन्हा संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तर नव्या व्हेरीएंट बाबत अलर्ट केले आहे.. 


जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी कोरोनाच्या बाबतीत मोठा इशाराच दिला आहे. कोरोनाची महामारी संपल्याच्या अफवावर विश्वास ठेवणे हा आपला मूर्खपणा असेल असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सद्या मिळू लागलेला दिलासा फार काळ टिकणार की नाही याबाबत शंका निर्माण होऊ लागली आहे.  कोरोनाच्या महामारीचा शेवट कधी होईल याचे उत्तर सद्या तरी कोणाकडेही नाही, कोरोनाची महामारी संपल्याच्या अफवांवर विश्वास ठेवून सद्या घेतली जात असलेली दक्षता कमी करणे हा आपला मूर्खपणा ठरेल. कुठल्याही क्षणी कोरोनाचा नवा व्हेरीएंट  येऊ शकतो आणि आपण पुन्हा पहिल्याच परिस्थितीत जाऊ शकतो, म्हणून आत्ताच सावध राहणे आवश्यक आहे. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत आपण योग्य परिस्थितीत येऊ शकतो अशी अपेक्षा आहे असे देखील सौम्या यांनी म्हटले आहे.


अमेरिकेसारख्या श्रीमंत असलेल्या देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा असून आफ्रिकेत देखील अनेक गरीब देशात अद्याप पुरेशी लस उपलब्ध नाही. आफ्रिकेत अजूनही ८५ टक्के लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देखील मिळालेला नाही. अशा परिस्थितीत कोरोनाचे नवे व्हेरीयंट येण्याची शक्यता आहे. हा विषाणू लोकांमध्ये पसरत निघाला असल्याने तशी शक्यता असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्याच शास्त्रज्ञांनी हे विधान केले असल्याने त्याला निश्चित वेगळे स्थान आहे. त्यामुळे कोरोना एवढ्यात आपला पिच्छा सोडेल असे चित्र त्यांच्या विधानावरून तरी दिसत नाही.


एकीकडे जागतिक आरोग्य संघटना धोक्याचा इशारा देत असतानाच महाराष्ट्रातील मंत्री कोरोनाची लाट फेब्रुवारीच्या अखेरीस ओसरणार असल्याचा दिलासा देत आहेत.  तिसरी लाट जेवढ्या वेगाने आली तेवढ्याच वेगाने ती कमी होताना दिसून आली आहे. कोरोनाच्या रुग्णात मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे त्यामुळे या विधानांना पुष्टी देखील मिळत आहे पण जागतिक आरोग्य संघटना मात्र याला अफवा म्हणू लागली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कालच जालना येथे बोलताना कोरोनाची तिसरी लाट मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत ओसरेल असे सांगितले आहे. गेल्या महिन्यात ४८ हजारापर्यंत पोहोचलेल्या रुग्णसंख्येत मोठी घसरण झाली आहे त्यामुळे राज्यात असलेले निर्बंध देखील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकर हटवले जातील असे टोपे यांनी स्पष्ट केले आहे. 


कोरोनाची तिसरी लाट ओसरायला सुरुवात झाली असली तरी सद्या मास्क मुक्तीचा निर्णय घेण्यात येणार नाही. कोरोनाची परिस्थिती पाहून ज्या त्या वेळेस हे निर्णय घेतले जातील परंतु कोरोना लाट ओसरत असली तरी नियमांचे पालन मात्र प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. लसीकरण देखील तितकेच महत्वाचे असून लस न घेतलेल्या नागरिकांनी त्वरित लस घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या १५ तारखेपासून कोरोनाची तिसरी लाट ओसरायला सुरुवात होईल आणि फेब्रुवारी अखेरपर्यंत कोरोना पूर्णपणे नियंत्रणात येईल असेही काही दिवसांपूर्वीच सांगण्यात आले होते आणि त्यानंतर आता मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत ही लाट ओसरणार असल्याचे सांगितले जात होते. राज्याचे मंत्री हे सांगत असताना राज्याच्या टास्क फोर्स ने देखील यावर शिक्कामोर्तब केले होते. 





कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारी अखेरीस संपण्याचा दिलासा आता टास्क फोर्सनेच दिला आहे. त्यामुळे हा मोठा दिलासा मानला जात आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरली तरीही गाफील राहून चालणार नाही असे मात्र टास्क फोर्सने आवर्जून सांगितले आहे. पुढच्या पंधरा ते वीस दिवसात कोरोनाची तिसरी लाट पूर्णपणे आटोक्यात येईल असे मात्र सांगण्यात आले आहे.  तिसरी लाट आता संपत आली असून येत्या पंधरा दिवसात रुग्णांची संख्या एकदम कमी होणार आहे. याचाच अर्थ फेब्रुवारीच्या शेवटापर्यंत कोरोनाची तिसरी लाट संपलेली असेल असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. 


राज्यातील २३ जिल्ह्यातील दर सरासरीपेक्षा अधिक आहे परंतु सर्वच जिल्ह्यातील सरासरी दर एकाचा असू शकत नाही. कुठे कमी तर कुठे अधिक अशी परिस्थिती असणार आहे परंतु कोरोनाची लाट पूर्णपणे आटोक्यात आलेली असेल. दिलासादायक परिस्थिती निर्माण होणार असली तरी गाफील राहता येणार नाही.  कोरोनाच्या नियमांकडे लगेच दुर्लक्ष करता येणार नाही. कोरोनाची लाट ओसरतेय म्हणून बेफिकीर राहणे महागात पडू शकते.  राज्यात कोरोना रुग्णांची संख्या घटताना दिसत असून तिपटीने रुग्ण कमी झालेले आहेत. नव्या रुग्णांची संख्या वेगाने घटत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. हा एक मोठा दिलासा असून टास्क फोर्सनेच तो दिला असल्याने त्याला एक वेगळे महत्व आहे. 


एकीकडे हा दिलासा मिळत असतानाच जागतिक आरोग्य संघटनेच्या इशाऱ्यामुळे मात्र संभ्रम निर्माण झाला आहे. जागतिक आरोग्य संघटना अत्यंत महत्वाची संस्था असून जगातील आरोग्यविषयक प्रत्येक घडामोडीवर त्यांचे बारकाईने लक्ष असते आणि प्रत्येक बाबींचा अभ्यास केला जातो. अशा मान्यवर संस्थेने दिलेला इशारा वेगळेच काही सांगत आहे त्यामुळे कोरोनाची पिडा खरोखरच पुढच्या महिन्यात संपणार आहे की पुन्हा चौथी लाट चोरपावलाने येणार आहे हे पाहावे लावणार आहे.   


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !