पंढरपूर : पंढरपूर म्युनिसिपल एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह सोसायटीत मोठ्या रकमेचा अपहार झाल्याप्रकरणी तत्कालीन चेअरमन आणि सचिवांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तब्बल २२ वर्षांपूर्वी झालेल्या अपहार प्रकरणाबाबत सहकारी संस्था लेखा परीक्षक महेश भानुदास सावंत यांनी याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००६ या दरम्यान हा गुन्हा घडला आहे. पंढरपूर नगरपालिकेच्या अशिक्षित सफाई कामगारांना विनासायास कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पंढरपूर म्युनिसिपल एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी नं. २ मध्ये ४ लाख २९ हजार ५९ एवढ्या रकमेचा अपहार करण्यात आला असून हा अपहार सोसायटीचे तत्कालीन चेअरमन मधुकर केराप्पा ढवळे आणि सचिव श्रीकांत रघुनाथ देशपांडे यांनी केला असल्याचे म्हटले आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर यांच्या आदेशाने लेखा परीक्षक सावंत यांची सदर सोसायटीच्या लेखापरीक्षणासाठी नियुक्ती करण्यात आली होती. सावंत यांनी लेखा परीक्षण केले असता त्यांना हा गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले आहे.
सोसायटीचे तत्कालीन चेअरमन मधुकर केराप्पा ढवळे आणि सचिव श्रीकांत रघुनाथ देशपांडे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी संगनमत करून संस्थेच्या रकमेचा गैरव्यवहार केला असल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे. त्यानुसार या दोघांच्या विरोधात ४ लाख २९ हजार ५९ हजार रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. संस्थेच्या सभासदांचा विश्वासघात करून स्वतःच्या फायद्यासाठी गैरव्यवहार करून संस्थेची फसवणूक केली म्हणून या दोघांच्या विरोधात लेखा परीक्षक महेश सावंत यांनी फिर्याद दिली आहे. तब्बल २२ वर्षांनी हा गैरव्यवहार उघडकीस आला आहे.
नियमबाह्य बोगस नावांची नोंद करून रकमा उचलण्यात आल्या, नगरपालिकेची भाडे पावती नसताना रक्कम अदा केल्याचे दाखविण्यात आले, संस्थेच्या नावे पावत्या नसताना देखील संचालकांना भेटवस्तू दिल्याचे दाखवून संस्थेच्या रकमेचा अपहार करण्यात आला. सभासद नसताना पोटनियमबाह्य कर्जवाटप करून संगनमताने संस्थेच्या रकमेचा अपघात केल्याच्या बाबी लेखा परीक्षणात आढळून आल्याने याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !