BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ फेब्रु, २०२२

विनापरवाना उसाचे गाळप, साडे पाच कोटींचा दंड !

 



करमाळा : विना परवाना ऊसाचे गाळप करणे मकाई साखर कारखान्यास भलतेच महागात पडले असून साखर आयुक्तांनी साडे पाच कोटींचा दंड या कारखान्यास केला आहे.


राज्यातील अनेक सहकारी साखर कारखान्यांनी मागील वर्षाची  शेतकऱ्यांची उसाची बिले दिली नाही. एफआरपी देण्याबाबत शेतकरी सतत आक्रोश करीत आहेत परंतु ही रक्कम देण्यास सहकारी साखर कारखाने असमर्थ ठरले आहेत. कारखाने आर्थिक अडचणीत आले असून त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही अडचणीत आणले आहे. अशा कारखान्यावर साखर आयुक्त यांनी आसूड उगारलेला आहे. अनेक कारखान्यांना यावर्षी गाळप करण्यास परवानगी देण्यात आली नाही पण काही कारखान्यांनी परवानगी नसताना ऊसाचे गाळप केले आहे. अशा कारखान्यांना आता भरमसाठ दंड केला जात असून यात सोलापूर जिल्ह्यातील मकाई सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. 


विनापरवाना ऊसाचे गाळप केल्याच्या कारणावरून करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखान्यास ५ कोटी ६३ लाख २ हजार ५०० रुपये एवढा दंड आकारण्यात आला आहे. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबत मकाई कारखान्यास नोटीस दिली असून पंधरा दिवसात हा दंड भरण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. दंडात्मक कारवाई करण्यापूर्वी साखर आयुक्त यांनी कारखान्यास म्हणणे मांडण्याची संधी दिली होती. त्यानुसार साखर कारखान्याच्या वतीने आपले म्हणणे सादर केले होते. 


मकाई साखर कारखान्याने १५ नोव्हेंबर ते १० जानेवारी पर्यंत १ लाख १२ हजार ६०५ टन ऊसाचे विनापरवाना गाळप केले म्हणून साखर आयुक्त यांनी दंडाची आकारणी केली आहे. साडे पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा हा दंड आकारण्यात आला असून दंडाची नोटीस मिळाल्यापासून पंधरा दिवसात ही रक्कम भरण्यात यावी असे देखील कारखान्यास सांगण्यात आले आहे. एवढा मोठा दंड भरण्याची मकाई साखर कारखान्याची कुवत नसून साखर आयुक्तांच्या या कारवाईच्या विरोधात अपील केले जाणार असल्याचे मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी सांगितले आहे.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !