पिंपळनेर : कांदा आणि मक्याच्या पिकात अफूची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने दोन शेतकऱ्यांच्या विरोधात निजामपूर (साक्री) पोलिसांनी १२ लाख रुपये किमतीची अफू जप्त केली.
विविध समस्यामुळे अलीकडे शेती करणे परवडत नाही अशी शेतकरी बांधवांची तक्रार असते. काही शेतकरी तर शेतात गांजा लागवड करण्यास परवानगी मागताना देखील दिसले आहेत. भारतात अशा प्रकारास कायद्याने बंदी असल्याने शेतकरी असे अमली पदार्थांचे पीक घेऊ शकत नाहीत. तरी देखील काही शेतकरी चोरून असे प्रकार करताना आढळतात आणि मग तुरुंगाची हवा अपरिहार्य ठरते. आत्तापर्यंत अनेक शेतकरी अशा प्रकारात अडकले आहेत तरी देखील असे प्रकार घडताना समोर येते.
साक्री तालुक्यातील दुर्गम असलेल्या भागात शेतकऱ्याने आपल्या शेतातील कांदा आणि मक्याच्या पिकात चक्क अफुचीच लागवड केली. निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या या शेतात अफू लागवड केली असल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या कानापर्यंत पोहोचली आणि पोलिसांनी आपला मोर्चा थेट या शेतकऱ्याच्या शेताकडे वळवला. चिंतामण पदमोर या शेतकऱ्याच्या शेतातील पिकांची पाहणी केली असता पोलिसांना कांदा पिकात अफू लागवड केलेली दिसून आली. या शेतापासून जवळच असलेल्या सोमा पांडू सूर्यवंशी यांच्या शेतात मक्याच्या पिकात अफूची लागवड केल्याचे पोलिसांना आढळून आले.
या दोन्ही शेतातून पोलिसांनी ११ लाख ८५ हजार ४७५ रुपये किमतीची अफू जप्त केली आणि दोन्ही शेतकऱ्यांच्या विरोधात एनडीपीएस कायदा कलम १७ क , १८ क आणि २० याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. चिंतामण पदमोर या शेतकऱ्यास पोलिसांनी अटक केली असून सोमा सूर्यवंशी मात्र पसार झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !