BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ फेब्रु, २०२२

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उडवली राज्याच्या राजकारणात खळबळ !

 



मुंबई : 'मातोश्री' वरील चौघांच्यासाठी ईडी ची नोटीस तयार असल्याचा गौप्यस्फोट केंद्रय मंत्री नारायण राणे यांनी केल्याने राज्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. 


महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणा सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी हा एकच विषय चर्चेचा आहे. महाविकास आघाडीचे नेते आणि मंत्री यांना या ईडीने घाम सोडला असून आजवर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना झळ बसली आहे. राज्यातील सत्ता हातची गेल्याने भारतीय जनता पक्ष अस्वस्थ असून त्यांच्या सांगण्यानुसार आणि राज्यातील सरकार पाडण्यासाठी भाजप या यंत्रणांचा वापर करीत असल्याची टीका सातत्याने होत आहे. या तपास यंत्रणा केवळ महाविकास आघाडीतील नेत्यांनाच टार्गेट करत आहे त्यामुळे एकूण प्रकार जनतेच्याही लक्षात आला आहे. 


केंद्रीय तपास यंत्रणा आता अधिकच वादात सापडल्या असून शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर अत्यंत स्फोटक आरोप या यंत्रणावर केलेले आहेत. शिवसेनेच्या काही नेत्यांना या आधीच या तपास यंत्रणांची झळ पोहोचलेली असून आणखी काही नेते रडारवर असल्याचे संकेत मिळत आहेत. भाजपचे काही नेते ईडीच्या होणार असलेल्या कारवाईबाबत आधीच माहिती देत असते त्यामुळे या कारवायांची माहिती त्यांना आधीच असते हे आता दडून राहिलेले नाही. त्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या यंत्रणेवर आरोप करून चांगलेच डिवचले आहे.  असे असतानाच आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्वीट करून थेट भाष्य केले आहे आणि मातोश्रीवरील चौघांच्या नावाच्या नोटीस ईडी कडे तयार असल्याचे म्हटले आहे. 


खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले असून यात अभिनेता सुशांतसिंग आणि दिशा सालियन यांच्या मृत्यूची पुन्हा चौकशी होईल तसेच 'मातोश्री' च्या चौघावर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळते असे नारायण राणे यांनी आपल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे. आज राणे यांचे हे संकेत आल्यापासून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 'विनायक राऊत, हे घडल्यावर आपले बॉस आणि आपण कुठे धावणार?' असे देखील नारायण राणे यांनी म्हटले आहे. 


राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजप सतत हे सरकार पडणार असल्याच्या तारखा देत आहे. महाविकास आघाडी सरकारने मात्र दोन वर्षे पूर्ण केली आहेत. तरीही अजूनही भाजप नेते सरकार पडणार असल्याच्या तारखा देतच आहे. स्वत: होऊन सरकार मधील लोक घरी बसतील असेही म्हणण्यात आले आहे. सरकार पाडण्यासाठी आपणास ऑफर तसेच धमकी आली असल्याचे संजय राउत यांनी जाहीरपणे सांगितलेले आहे. आणि आता केंद्रीय मंत्री यांनी 'मातोश्री' चा उल्लेख करून ईडी कारवाईचे संकेत दिले आहेत. मातोश्री वरील चारजणांचा उल्लेख त्यांनी केला आहे. 


नारायण राणे यांनी दिलेले हे संकेत महाविकास आघाडीची काळजी वाढविणारे नक्कीच असून 'मातोश्री' वरील कुणावर कारवाई होणार असा प्रश्न राज्यातील सगळ्याच नेत्यांना पडला आहे. त्यात भाजपचे किरीट सोमय्या सतत संकेत देत आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि परिवाराला टार्गेट केले असल्याचेही गेल्या काही काळापासून दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कथित १९ बंगल्यांचा विषय देखील सद्या सोमय्या यांच्याकडून वाजत गाजत आहे. त्यामुळे नारायण राणे यांचा रोख नक्की कुणाकडे आहे ? याच्या उत्तराच्या शोधाला अनेक नेते लागलेले आहेत.   


आधीच भाजपच्या अनेक नेत्यांनी महाविकास आघाडीतील काही नेते लवकरच तुरुंगात जातील असे म्हटले आहे आणि त्यात  नारायण राणे यांनी हे संकेत दिले आहेत. शिवाय संजय राऊत यांनी तर राज्यातील सरकार पाडण्यासाठी या यंत्रणांचा कसा वापर होत आहे हे जाहीरपणे सांगितले आहे. राउत यांनी नुकतीच शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेवून सक्तवसुली संचालनालयाला आणि अधिकाऱ्यांना टार्गेट करून अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत. त्यानंतर देखील राऊत यांनी ईडीला सतत डिवचले आहे.  


एकूणच सगळी परिस्थिती अत्यंत तणावाची असताना राणे यांनी दिलेला हा इशारा राजकीय वर्तुळात गंभीरपणे घेतलेला दिसत आहे.  राणे यांनी कुणाचे नाव घेतले नसले तरी 'मातोश्री' चा उल्लेख केलेला आहे. 'मातोश्री' हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान आहे याची माहिती महाराष्ट्राला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात काही घडलेच तर ते नक्कीच धक्कादायक असणार आहे याचे मात्र संकेत स्पष्ट होत आहेत.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !