BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ फेब्रु, २०२२

राज्यात 'अनलॉक' चा निर्णय मार्च नंतरच !

 



मुंबई : कोरोनाची तिसरी लाट ओसरत असली तरी राज्यात अनलॉक होण्यास आणखी प्रतीक्षाच करावी लागणार असून मार्च महिन्याच्या नंतरच शंभर टक्के अनलॉक करण्याचा निर्णय घेता येईल असे राज्याच्या टास्क फोर्सने स्पष्ट केले आहे.


कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागली तेंव्हा अनेक निर्बंध कमी करण्यात आले होते आणि आता हळूहळू सगळेच निर्बंध हटतील असे वाटू लागले असतानाच कोरोनाची तिसरी लाट येऊन धडकली आणि पुन्हा निर्बंधाचा फास आवळत गेला. दरम्यान आता पुन्हा कोरोनाची तिसरी लाटही झपाट्याने ओसरताना दिसत आहे. अनेक भागात तर कोरोना जवळपास संपुष्टात आलेला आहे. या दिलासादायक परिस्थितीमुळे राज्यातील कोरोनाचे निर्बंध आता पूर्णपणे हटतील अशी अपेक्षा होती. त्यातच केंद्र सरकारने देखील अतिरिक्त निर्बंध हटविण्याच्या सूचना राज्यांना दिल्या आहेत. तथापि राज्यातील निर्बंध आणखी दीड महिना तरी हटणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.


कोरोना सद्या नियंत्रणात आहे, हीच परिस्थिती कायम राहिल्यास मार्च अखेर नंतरच राज्यात शंभर टक्के अनलॉक करण्याचा निर्णय घेता येईल असे टास्क फोर्स ने सांगितले आहे. टास्क फोर्सचे मत विचारात घेऊनच राज्य सरकार निर्णय घेत असते त्यामुळे मार्च महिना संपेपर्यंत तरी राज्यात अनलॉकची परिस्थिती येणार नाही हे स्पष्ट झाले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ओमीक्रॉनची मोठी भीती होती परंतु तरीही तिसरी लाट वेगाने आटोक्यात आणली गेली. तिसरी लाट येईल की नाही याबाबत अनेक मतमतांतरे होती. लाट येणारच नाही असाही दावा केला जात होता पण तिसरी लाट आली आणि मनात भीती निर्माण झाली. जेवढी भीती होती तेवढा उपद्रव या लाटेने दिला नाही आणि अपेक्षेपेक्षा कमी काळात या लाटेने परतीचा प्रवास देखील सुरु केला.  


तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होऊ लागल्याने उद्याने, मैदाने, पर्यटन स्थळे आदी ठिकाणी निर्बंध हटविण्यात आले. हॉटेल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे याना पन्नास टक्के क्षमतेने खुली करण्यात आली. त्यानंतर आता कोरोनाची लाट वेगाने ओसरत असल्याने राज्य अनलॉक कधी होईल याची प्रतीक्षा राज्याला लागलेली आहे. राज्य अनलॉक करण्याची घाई न करता आणखी काही दिवस खबरदारी घेतली पाहिजे आणि जर कोरोना असाच नियंत्रणात राहिला तर शंभर टक्के अनलॉक करता येईल अशा भूमिकेत टास्क फोर्स आहे.  आत्ताची परिस्थिती आणि भविष्यातील संभाव्य परिस्थिती याचाही विचार करणे आवश्यक ठरत असते, शिवाय जगातील अन्य देशात काय परिस्थिती आहे याचा अभ्यास देखील महत्वपूर्ण ठरत असतो.  


गेल्या पंधरा दिवसांपासून मास्कमुक्तीबाबत चर्चा सुरु आहे. दोन वर्षांपासून जनतेच्या चेहऱ्यावर मास्क आहे तो कधी काढला जाणार हा प्रश्न सतत विचारला जात आहे. मास्क पासून आता सुटका होणार अशीही चर्चा सुरु झाली होती परंतु मास्कपासून एवढ्यात दिलासा मिळणार नसल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. अजूनही तशीच परिस्थिती असून मास्क मुक्तीची वेळ अजून आलेली नाही, मार्च महिन्याच्या अखेरची परिस्थिती विचारात घेऊनच मास्क मुक्तीबाबत निर्णय घेता येईल असेही टास्क फोर्सने सांगितले आहे. कोरोनाची तिसरी लाट ओसरत असली तरी ब्रिटनमध्ये नवा व्हेरिएंट आढळून आला असून भविष्यात आणखी काही व्हेरिएंट येण्याची शक्यता आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली असल्याने टास्क फोर्स सावधानतेने निर्णय घेत आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !