BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ फेब्रु, २०२२

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या पराभवानंतर काय धडा घेतला ?

 



पंढरपूर : पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आपण काय धडा घेतला आणि कारखान्याच्या पलीकडे जाऊन आपण काय केले? असा खणखणीत सवाल विचारत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भगीरथ भालके यांना वास्तवतेची जाणीव करून दिली 


दिवंगत आमदार भारतनाना भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादीची अवस्था खिळखिळी झाली आहेच शिवाय पोटनिवडणूक झाल्यापासून भगीरथ भालके हे सतत नॉट रिचेबल असतात म्हणून कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक देखील नाराज असल्याची चर्चा नेहमी होत आली आहे. सर्वसामान्याचे नेते नव्हे तर कुटुंबातील एक सदस्य असल्याप्रमाणे भारतनानांनी काम केले आणि प्रत्येकाला आपलेसे केले होते. सामान्य जनतेची भगीरथ भालके यांच्याकडून देखील तशीच अपेक्षा आहे.  परिस्थिती अनुकूल असतानाही पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला पराभव स्वीकारावा लागला हे पक्षाच्या जिव्हारी लागलेले आहे परंतु त्यानंतर पक्षाची अवस्था अत्यंत बिकट झाली असल्याने सर्वसमान्य माणूस देखील अस्वस्थ झालेला दिसत आहे. त्यातच आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक प्रकारे 'हजेरी' च घेतली आणि भगीरथ भालके यांना खडे बोल सुनावले आहेत.   


पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आपण येत होतो तेंव्हा आपण उमेदवार भगीरथ भालके आणि इतरांना बूथ कमिटी कुठे आहे हे दाखवा असे विचारत राहिलो, आज देतो उद्या देतो असे करीत वेळ मारून नेण्यात आली पण बूथ कमिटी दिसलीच नाही. प्रत्यक्षात बूथ कमिट्याच केल्या नव्हत्या हे माझे आज देखील मत असून आजही आपण याबाबत भगीरथ भालके यांना विचारले आहे . जर या बूथ कमिट्या असत्या आणि प्रत्येक बुथवर आपली यंत्रणा सज्ज असती तर दोन तीन हजाराचा फरक भरून काढायला अवघड गेले नसते. बूथ कमिट्या असतील तर आनंद आहे पण आपणास निवडणुकीवेळी त्या दिसलेल्या नाहीत. यादी देणे वेगळे आणि बूथ कमिटी अध्यक्षांना समोर बसवणे वेगळे असे म्हणत जयंत पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली. 


आपण सतत बूथ कामिटीबाबत विचारात राहिलो, बूथ कमिटी अध्यक्षांना बोलवा असे सांगत राहिलो होतो. बूथ कमिटीच्या मार्फत निवडणूक नियोजन केले तर अपयश कुठेही येऊ शकत नाही असे आपले मत आहे आणि  तसा पूर्ण विश्वास आहे. त्यातूनही पराभव झाला, ठीक आहे, निवडणूक म्हटल्यावर पराभव होणेदेखील स्वाभाविक आहे, पराभव कोणाचा होत नाही ? या देशात इंदिरा गांधी यांचा देखील पराभव झाला होता. पण पराभवानंतर तरी आपली संघटना सुस्थितीत आणली तर पुढचा विजय शक्य होऊ शकतो. पराभव झाल्यापासून आत्तापर्यंत आपण काय प्रयत्न केले ?  साखर कारखान्याचे पैसे दिले की नाही दिले इथवरच आपली चर्चा मर्यादित राहिली आहे. कारखान्याच्या पलीकडे जाऊन मतदान खूप मोठे आहे. साखर कारखान्याची व्यवस्था तर करायला पाहिजेच, काही मार्ग काढायला पाहिजे इथवर मान्य आहे पण त्यात आपलं राजकारण अडकून पडायला नको आहे. आपल्या मतदार संघात चार लाख लोकसंख्या आहे, त्यांचे प्रश्न हातात घेऊन आपण किती लढलो ? त्यांचे सार्वजनिक हिताचे मुद्दे हातात घेऊन आपण किती लढलो ? त्यासाठी आपण किती चळवळी केल्या ? त्यासाठी आपण आग्रहाने कुठे कुठे प्रयत्न केले ? अशा अनेक प्रश्नाची सरबत्तीच जयंत पाटील यांनी केली. 


विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे महत्व आहेच, त्याचे महत्व मी कमी लेखत नाही, कारखान्याचा विषय तर पहिलाच पाहिजे पण त्या पलीकडे जाऊन आपण कोणते मुद्दे हातात घेतले आणि तळागाळापर्यंत संघटना किती बांधली याचा देखील अभ्यास करणे महत्वाचे आहे अशा कानपिचक्या देखील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या आहेत. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत आपल्या हातात असणारा विजय निसटला आणि पराभव पत्करावा लागला पण याचा कधी अभ्यास केला आहे का? पराभवाचे कारण कधी शोधले आहे का? असा सवाल पाटील यांनी आज जाहीरपणे विचारला.  


निवडणुकीत सगळे वातावरण आपल्या बाजूने असताना, सहानुभूती आपल्या बाजूने असताना आपला पराभव झाला. मागच्या निवडणुकीपेक्षा जास्त मते मिळाली तरीही आपला पराभव झाला. समोरचे दोघे एकत्र आले तरी राजकारणात एक अधिक एक दोन असे कधीच होत नसते पण त्यांचे मात्र झाले. आपली मते वाढली आणि समोरच्यांची मते कमी झाली. असे असतनाही आपला पराभव आणि त्यांचा विजय झाला. याची खंत देखील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली. भगीरथ भालके यांचा पराभव होईल असे सामान्य मतदारानाही वाटत नव्हते आणि त्यांच्या या पराभवानंतर सामान्य माणूस देखील नानांच्या आठवणीने रडलेला आहे.


पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीच्या आधीपासून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद आहेत. निवडणुकीच्या तोंडावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अंतर्गत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो मिटला असल्याचे चित्र निवडणुकीत आजीबात दिसले नाही. राष्ट्रवादीचे भगीरथ भालके यांचा विजय सहज शक्य वाटत असताना देखील त्यांचा पराभव झाला याला अंतर्गत मतभेद हे एकमेव आणि प्रमुख कारण आहे. अजूनही राष्ट्रवादीतील धुसफूस कमी झाली नसून ती वाढतच चालली आहे. समोर नगरपालिका निवडणूक असतानाही या मतभेदावर तोडगा निघालेला नाही. राष्ट्रवादीची परिस्थिती अशीच राहिली तर नगरपालिका निवडणुकीतही फारसे यश मिळण्याची शक्यता धूसर होणार आहे. यावर पक्ष पातळीवरून कधी आणि कोणते प्रयत्न केले जातील यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !