पुणे : मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वरती सकाळी झालेल्या विचित्र अपघातात सोलापूर येथील चार जण ठार झाल्याची माहिती पुढे आली असून यात जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्याचा समावेश आहे.
खोपोलीजवळ बोरघाटात आज भल्या सकाळी अत्यंत विचित्र अपघात झाला आहे. अनेक वाहनांचा एकाच वेळी हा अपघात झाला असून या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर येथून एक कुटुंब मारुती स्विफ्ट गाडीतून मुंबईकडे निघालेले होते. यावेळी एका ट्रेलरचा ब्रेक निकामी झाल्याने तो कार, टेम्पो आणि अन्य दोन कंटेनर या वाहणा धडकला. हे सर्व वाहने एकापाठोपाठ एक अशी निघालेली होती. यात स्विफ्ट गाडीचा चक्काचूर झालेला असून त्यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अन्य सात जण जखमी झालेले आहेत. या जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातात मृत्युमुखी पडलेले चौघे हे सोलापूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. यातील तिघांची ओळख पटली असून चौथ्याची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. गौरव खरात ( वय ३६ ), सौरभ तुळसे (वय ३२) आणि सिद्धार्थ राजगुरू (वय ३१) अशी ओळख पटलेल्या मृतांची नावे आहेत. सोलापूर येथील काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात यांच्यासह चार जण सोमवारी रात्री सोलापूरहून मुंबईकडे निघाले होते. त्यांच्या गाडीला खोपोलीजवळ अपघात झाला आहे. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य सात जखमी झाले आहेत. काळजाचा थरकाप उडविणारा हा अपघात होता.
ट्रेलरचा ब्रेक निकामी झाल्यामुळे पाच ते सहा वाहनांचा हा अपघात झाला आहे. पुढे जाणाऱ्या कंटेनरने स्विफ्ट कारला (एम एच १३ बी एन ७१२२) जोराची धडक दिली आणि ही कार तिच्यापुढे असलेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून धडकली. टेम्पोने त्याच्यापुढे असलेल्या वेन्यु कारला जोराची धडक दिली. या कारने देखील पुढच्या कंटेनरला धडक दिली. पुढचा कंटेनर मात्र पुढे निघून गेला आहे. स्विफ्ट कारमध्ये असलेल्या चोघाचा मृत्यू झाला तर टेम्पोने धडक दिलेल्या कारमधील अन्य प्रवासी जखमी झाले. या अपघातानंतर रस्त्यावरील वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !