BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ फेब्रु, २०२२

दोन दरोड्यातील आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळल्या !

 



मंगळवेढा : तालुक्यात खळबळ उडवून दिलेल्या दोन दरोड्यातील आंतरराज्य टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून मंगळवेढा पोलिसांचे हे मोठे यश आहे.


मंगळवेढा तालुक्यात चोरीच्या अनेक घटना घडतात पण मागील वर्षी ऑगष्ट आणि डिसेंबर महिन्यात मंगळवेढा परिसरात पडलेले दोन दरोडे विशेष चर्चेला आहे होते. ७ ऑगष्ट रोजी दामाजीनगर येथे सुवर्णा हजारे यांच्या बंगल्यावर दरोडा घालण्यात आला होता. त्यांच्या बंगल्याचा दरवाजा तोडून दरोडेखोर बंगल्यात घुसले होते आणि त्यांनी सुवर्णा हजारे आणि त्यांच्या पतीला लोखंडाच्या गजाने मारहाण केली होती. यात त्यांचा हाताच्या हाडाला दुखापत झाली होती. या दरोड्यात दीड तोळे सोने घेऊन दरोडेखोर पसार झाले होते. 


डिसेंबर महिन्यात नागणेवाडी चैतन्यनगर येथे मंदाकिनी सावंजी यांच्या बंगल्यात दरोडेखोर घुसले होते. बंगल्यातील नववधूवर दाम्पत्यांना ठार करण्याची धमकी देत त्यांच्याकडील ११ तोळे सोने या दरोडेखोरांनी लुटले होते. या घटनेने मंगळवेढा तालुका हादरून गेला होता.  नागरिकात कमालीची दहशत निर्माण झाली होती तर पोलिसांच्या पुढे या तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले होते. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी आपले प्रयत्न नेटाने सुरु ठेवले होते आणि अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून पोलिसांनी आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 


कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील अलीपूर तांडा येथील तीस वर्षे वयाचा रवी उर्फ विकी बाळूराव भोसले, बसलापूर येथील चाळीस वर्षे वयाचा नजीर झुंबर पवार उर्फ पारधी आणि मंगळवेढा तालुक्यातील धर्मगाव येथील १९ वर्षीय दिनकर नारायण भोसले या तिघांना या दरोड्यांप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी दीपक उर्फ बबलू सावंत उर्फ झबरू पवार हनुमान टेकडी, लोणावळा याला आधीच अटक करण्यात आले आहे आणि त्याच्याकडून पाच लाख रुपये किमतीचे दहा तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे. 


मंगळवेढा येथील दोन दरोड्यांप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींनी महाराष्ट्रासह गुजराथ, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यात देखील अशाच प्रकारचे गुन्हे केले असल्याची पोलिसांची माहिती आहे. सदर दरोडा प्रकरणी आणखी दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी नियोजन केले असून त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. मंगळवेढा पोलिसांनी मिळविलेल्या या यशाबद्धल नागरीकातून समाधान व्यक्त करण्यात आले असून दरोडेखोरांना देखील यामुळे जरब बसणार आहे.   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !