नवी दिल्ली : वाहन चालवताना मोबाईलवर बोलताना पोलिसांनी पहिले की दंडाची पावती नक्कीच हातात येते पण आता आगामी काळात गाडी चालवताना फोनवर बोलला तरी कारवाई होणार नाही, त्यामुळे बिनधास्त बोलता येणार आहे.
वाहन चालवताना नेमका महत्वाचा फोन येतो आणि फोन घेताच समोर पोलिसांची शिट्टी ऐकू येते. वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे हा गुन्हा आहे त्यामुळे दंड, शिक्षेला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसतो. अलीकडे तर वाहतुकीचे नियम अधिक कडक करण्यात आले असून हे नियम मोडणाऱ्यास मोठा दंड भरावा लागत आहे त्यामुळे वाहनधारक वैतागले आहेत पण वाढत्या दंडामुळे नियमांचे पालन देखील होताना दिसत आहे. वाहन चालवताना कानाला मोबाईल दिसला की पोलीस हमखास गाडी थांबवतात आणि हातात भल्या मोठ्या दंडाची पावती टेकवतात. पुढील काळात मात्र असे घडणार नाही. वाहन चालवताना फोनवर बोलणे हेच कायदेशीर केले जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीच याबाबत स्पष्टपणे सांगून टाकले आहे.
वाहन चालवताना मोबाईलवर बोलता येईल परंतु त्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. गाडी चावताना फोनवर बोलणे आता गुन्हा ठरणार नाही, लवकरच याबाबत लोकसभेत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. गाडी चालवत असताना तुम्ही फोनवर बोलू शकता पण यावेळी मोबाईल तुमच्या हातात नसायला हवा आहे. इअरफोन, ब्लू टूथ अशा प्रकारची उपकरणे वापरून वाहन चालवतानाही फोनवर बोलता येईल. यावेळी मोबाईल खिशात अथवा बाजूला असावा. अशा पद्धतीने जर वाहन चालवताना मोबाईलवर बोलल्यास गुन्हा ठरणार नाही आणि वाहतूक पोलीस दंड आकारणार नाहीत. याबाबतची घोषणा लवकरच लोकसभेत केली जाईल असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.
गाडी चालवताना मोबाईलवरून गप्पा मारण्याची अनेकांना सवय असते आणि यातून अनेक अपघात देखील होत असतात. रस्त्यावरून जाताना अनेक दुचाकीस्वार मान वाकडी करून मोबाईलवर बोलत असतात आणि गाडी वेगात हाकत असतात. यामुळे अपघात होण्याशी शक्यता सतत असते. गाडी थांबवून बोलणे यांच्या माहितीत देखील नसते. स्वतःबरोबर इतरांचा देखील जीव धोक्यात घालत असतात. मोबाईलवरून बोलत गाडी चालवत असताना त्यांचे लक्ष वाहन चालविण्याकडेही नसते आणि समोर रस्त्यावर देखील नसते. या प्रकारामुळे काय घडते हे अनेकदा पहायलाही मिळत असते.
वाहतुकीचे नियम पायदळी तुडविल्याने अपघात होत असल्याची माहिती प्रत्येकाला असते तरी देखील नियमांकडे लक्षपूर्वक दुर्लक्ष केले जात असते. आपल्या बरोबर इतरांचा जीव देखील धोक्यात घातला जातो. अलीकडे अपघाताचे प्रमाण वाढू लागल्याने वाहतुकीचे अनेक नियम कडक करण्यात आले आहेत आणि दंडाची तरतूद देखील मोठ्या रकमेची करण्यात आल्याने वाहनधारक अस्वस्थ आहेत. अशा परिस्थितीत थोडासा का होईना पण हा दिलासा लाभणार आहे. आता याबाबत लोकसभेत कधी घोषणा होतेय आणि कधीपासून हे अमलात येतेय याकडे वाहनधारकांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !