BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ फेब्रु, २०२२

पी.ए.नेच काढला बच्चू कडू यांचा 'काटा' !


 

अमरावती : सामान्य जनतेत लोकप्रिय असलेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्याच्या कारावासाची शिक्षा झाली असली तरी त्यांच्याच पी. ए. मुळे त्यांच्यावर ही संकटाची वेळ आली आहे. 


अत्यंत आक्रमक आणि सामान्य माणसासाठी सदैव झटणारे बच्चू कडू हे विद्यमान महाविकास आघाडी सरकारमध्ये शिक्षण राज्यमंत्री आहेत. २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज सादर करताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपविली असल्याचा  ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे . भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी याबाबत कडू यांच्या विरोधी तक्रार दाखल केली होती. यावर सुनावणी होऊन चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने कडू यांना २ महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.


सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणकीत नियमानुसार निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीची माहिती देणारे प्रतिज्ञापत्र बच्चू कडू यांनीसादर केले होते. त्यात त्यांनी मुंबई इथे असलेल्या फ्लॅट बाबतीत कोणतीही माहिती दिलेली नव्हती. त्यामुळे अमरावतीच्या अचलपूर येथील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली होतीया तक्रारीवर सुनावणी झाली आणि चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. 


न्यायालयाने देलेल्या शिक्षेबद्धल बोलताना बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'चुकीच्या निर्णयाचे स्वागत करतो' असे त्यांनी या निकालानंतर म्हटले आहे. भाजपचे नगरसेवक असणारे गोपाल तिरमारे यांनी पोलिसात केलेल्या तक्रारीनंतर या खटल्याची न्यायालयात सुनावणी झाली आणि शिक्षा ठोठावण्यात आली आहे.  हे तक्रारकर्ते तिरमारे कोण आहेत याची अनेकांना उत्सुकता लागून राहिली असून कडू यांच्यावर तक्रार करणारे हे राजकीय विरोधक असतील असा अनेकांचा कयास देखील आहे. प्रत्यक्षात हे गोपाल तिरमारे हे बच्चू कडू यांच्या अगदी जवळचे असलेली व्यक्ती आहे. याची माहिती मिळाल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेची स्थापना केली आणि तिचा विस्तार राज्याच्या अनेक भागात पोहोचला आहे. या संघटनेच्या अथवा पक्षाच्या स्थापनेपासून तिरमारे हे बच्चू कडू यांच्या सोबत राहिले. प्रहार संघटनेने केलेल्या अनेक आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला. सन २००७ पासून हे तिरमारे बच्चू कडू यांच्यासोबत होते.  त्यानंतर पुढे ते कडू यांचेच स्वीय सहायक बनले. पी ए म्हणून काही काळ तिरमारे यांनी कडू यांच्यासोबत काम देखील केले, नगरसेवकही बनले. नंतर मात्र तिरमारे यांनी कडू यांच्यापासून फारकत घेतली. त्यांच्या विरोधात जात ते नगरसेवक बनले.  


सन २०१५ मधील नगरपरिषद पोटनिवडणुकीत 'प्रहार' च्या वतीने मनीषा नागलीया यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांना ही उमेदवारी दिल्याचे जाहीर देखील करण्यात आले होते पण ऐनवेळी सुनिता गणवीर यांना मतदान करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार गोपाल तिरमारे यांच्यासह अन्य तीन नगरसेवकांनी मनिषा नागलिया यांनाच मतदान केले. या निवडणुकीत नागलिया यांचा विजय देखील झाला. सुनिता गणवीर यांना मतदान करण्याचा आदेश असताना तिरमारे यांनी मनिषा नागलिया यांना मतदान केल्याने बंडखोर म्हणून गोपाल तिरमारे यांच्या विरुद्ध सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई सुरु झाली. त्यांच्यासोबत अन्य तीन नगरसेवकाच्या विरोधात देखील अशी कारवाई करण्यात येऊ लागली त्यामुळे कडू आणि तिरमारे यांच्यातील दरी वाढत गेली.    


'प्रहार' च्या स्थापनेपासून सोबत असलेले आणि प्रत्येक आंदोलनात सहभागी झालेले तिरमारे हे शेवटी बच्चू कडू यांच्याच विरोधात गेले आणि त्यांनीच प्रतिज्ञापत्रातील दोष चव्हाट्यावर आणला. बच्चू कडू यांनी निवडणुकीवेळी प्रतिज्ञापत्र सदर करताना मुंबईतील घर दाखवले नसल्याची तक्रार याच तिरमारे यांनी केली आणि बच्चू कडू यांना न्यायालयाने दोषी ठरवत दोन महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.     



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !