BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१३ फेब्रु, २०२२

पंढरपूर : सैनिकाच्या घरात घुसून तोडफोड !

 



पंढरपूर : बंद असलेल्या सैनिकाच्या घरात घुसून तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे दोघांनी घरातील तोडफोड केल्याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


देशाच्या रक्षणासाठी सैनिक आपल्या घरापासून दूर राहतो पण त्याचेच गावाकडील घर सुरक्षित राहू शकत नाही असाच काहीसा अनुभव पंढरपूर तालुक्यातील या घटनेने आला आहे. सैनिक आपल्या कर्तव्यावर असताना आणि त्यांच्या घरात कुणीही नसताना त्यांच्या घराची तोडफोड करण्याची घटना पंढरपूर शेजारीच असलेल्या लक्ष्मी टाकळी येथे जगदंबा नगरमध्ये घडली असल्याची तक्रार पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोपट एकनाथ कोळी हे नायब सुभेदार पदावर सैन्य दलात कार्यरत असून जम्मू काश्मीर येथे ते कर्तव्यावर आहेत. पंढरपूरलगत असलेल्या लक्ष्मी टाकळी येथे त्यांची दोन घरे आहेत परंतु एका घरात भाडेकरू राहतात तर दुसरे घर त्यांच्याकडेच असले तरी त्यांचे कुटुंबीय सुटीच्या काळात या घराचा वापर करतात. त्यांचे कुटुंब बेळगाव येथे राहत असले तरी सुटीच्या काळात ते येथे येवून राहतात. जानेवारी महिन्यातच पोपट कोळी यांच्या पत्नी रेश्मा कोळी या येथील घरी आल्या होत्या आणि त्यांनी काही दिवस येथे राहून घराची दुरुस्ती केली होती. 


घराची दुरुस्ती करून रेश्मा कोळी जाऊन अजून महिना देखील पूर्ण झाला नाही तोच त्यांच्या घरात ही घटना घडली असून याप्रकरणी सैनिकाच्या नात्यातील व्यक्तीनेच हा प्रकार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. रामबाग, पंढरपूर येथे राहणारा त्याचा भाचा सचिन वासुदेव अधटराव आणि त्याचा साथीदार यांनी त्यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून खिडक्या, जाळ्या, भिंतीच्या टाईल्सची तोडफोड केल्याची माहिती त्यांना फोनद्वारे मिळाली. त्यानंतर रेश्मा कोळी या मिरज येथील आपला भाऊ प्रकाश कोळी यांना घेऊन आल्या आणि त्यांनी घराची पाहणी केली. 


सदर तोडफोडीत घराचे सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान केल्याचे त्यांना आढळून आले. सदर प्रकरणी रेश्मा कोळी यांनी पंढरपूर तालुका पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी सचिन अधटराव आणि त्याच्या एक साथीदार अशा दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सचिन हा सैनिक कोळी यांचा भाचा आहे. त्याच्यासह त्याच्या एका साथीदाराने हा प्रकार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !