किनवट : भावाच्या निधनाची बातमी समजली आणि बहिणीने आपला प्राण सोडल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आणि गावावर शोककळा पसरली.
बहिण भाऊ यांच्यातील नात्याचा गोडवा काही वेगळाच असतो आणि या नात्याची वीण देखील एकदम घट्ट असते. आपला भाऊ सदैव सुखात रहावा अशी प्रार्थना बहिण करीत असते आणि बहिणीच्या चेहऱ्यावर अखंड हसू फुलावं यासाठी भाऊ सतत प्रयत्नशील असतो. अशा भाऊ बहिणीची एक करून कहाणी किनवट तालुक्यातील शिवणी या गावात घडली आणि अख्खं गाव शोकात आकंठ बुडालं आहे. लाडक्या भावाचा मृत्यू झाल्याची बातमी येऊन धडकली आणि बहिणीने काही क्षणात आपला देखील प्राण सोडला. पतीच्या निधनाची बातमी ऐकून पत्नीने प्राण त्यागल्याच्या काही घटना घडल्या होत्या पण आता भावाच्या निधनाच्या बातमीने बहिणीने आपला प्राण सोडल्याची घटना घडली आहे
किनवट तालुक्यातील शिवणी गावापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कंचली येथील रहिवाशी असलेले बाबू राठोड हे पुणे येथे नोकरीस असतात पण ते एका लग्न सोहळ्यासाठी तीन दिवसांपूर्वी गावी आलेले होते. गावी आल्यानंतर त्यांच्या पोटात दुखू लागले. पोटातील वेदना अधिक वाढत गेल्याने त्यांना नांदेड येथील एक रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. रुग्णालयात नेले जात असतानाच बाबू राठोड (४५) यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूची बातमी वेगाने गावापर्यंत आणि नातेवाइकापर्यंत पोहोचली.
गावभर पसरलेली ही बातमी गावातच असलेली त्यांची साठ वर्षे वयाच्या बहिण यशोदाबाई रामू जाधव यांच्या कानापर्यंत गेली. जशी ही दु:खद बातमी यशोदाबाईना समजले तसे पुढच्याच क्षणी त्यांना हृदय विकाराचा जोरदार धक्का बसला. नातेवाईकांनी यशोदाबाई यांना तातडीने शिवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले पण तेथे जाण्याच्या आधीच त्यांनी प्राण सोडला होता. एकाच दिवशी काही मिनिटांच्या अंतराने भाऊ आणि बहिण दोघांनीही आपला प्राण सोडला त्यामुळे गावावर शोककळा पसरली.
गावातील प्रत्येकजण हळहळ व्यक्ती करीत राहिला पण भाऊ आणि बहिण यांची मृत शरीरे निपचित पडलेली होती. बहिणीचे भावावर एवढे प्रेम होते की बातमी ऐकताच बहिण कोसळली आणि भावाच्या पाठोपाठ बहिणीने देखील हे जग सोडले. गावकरी मात्र निशब्द झाले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !