मुंबई : महाराष्ट्र थंडीने गारठला असताना ही थंडी कायम राहणार असून पुढील दोन दिवसात राज्यात थंडीची लाट येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हिवाळा संपत आला आहे असे वाटत असतानाच कडाक्याची थंडी पडली असून अवघा महाराष्ट्र गेल्या चार पाच दिवसांपासून गारठून गेला आहे. कधी एकदा थंडी कमी होतेय याची प्रतीक्षा असतानाच हवामान विभागाने आणखी थंडीचा इशारा दिला आहे त्यामुळे आणखी काही दिवस तरी गारठ्यात काढावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या २४ तासात राज्यातील तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे गारठा वाढून थंडीच्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पश्चिम चक्रवातामुळे थंडी वाढत असून राज्यातील काही जिल्ह्यात थंडीची तीव्र लाट सुरु आहे. मागील २४ तासात विविध भागात अत्यंत कमी तपमान नोंदले गेले आहे. पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, नाशिक तसेच मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, बीड, परभणी येथे थंडीची लाट होती. आणखीही या जिल्ह्यातील तपमान खाली येणार असून २४ तासात या जिल्ह्यात आणखी थंडी जाणवणार आहे. विदर्भात तर निचांकी तापमान नोंदले गेले असून आगामी २४ तासात कडाक्याच्या थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. पुणे, मुंबई, नवी मुंबई येथे तापमानात मोठी घट झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमान १० अंश सेल्सियस पर्यंत खाली जाणार असून दिवसरात्र हवेत प्रचंड गारवा राहणार आहे अशी माहितीही हवामान विभागाने दिली आहे.
पुढील तीन ते चार दिवसात दहा राज्यात आणि केंद्र शासित प्रदेशात थंड लाट येणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. आगामी दोन दिवसात महाराष्ट्र आणि गुजरात राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. ही थंडीची लाट केवळ या दोन राज्यापुरतीच नसून राजस्थान, मध्य प्रदेश, दिल्ली, चंडीगड, पंजाब, हरियाणा, ओरिसा, छत्तीसगड या राज्यातही आगामी चार दिवसात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दहा राज्यात थंडीच्या लाटेचा धोका असून नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आजारी असलेल्या तसेच जेष्ठ नागरिकांना या थंडीमुळे उपद्रव होण्याची अधिक शक्यता असते त्यामुळे थंडीपासून बचाव करण्याच्या उपाययोजना करण्यात याव्यात असे आवाहन करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !