ब्रेडन टेलरचा गौप्यस्फोट !
मुंबई : भारतात बोलावून आपल्याला मॅच फिक्सिंगसाठी ब्लॅकमेल करण्यात आले, असा गौप्यस्फोट झिम्बाब्वेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ब्रेडन टेलर याने करून खळबळ उडवून दिली आहे.
क्रिकेट हा अत्यंत लोकप्रिय खेळ असून जगभरात क्रिकेटचे शौकीन आहेत पण या खेळाला फिक्सिंगचा कँसर लागलेला असून अनेक खेळाडूंची कारकीर्द या फिक्सिंगने बरबाद केली आहे. असे असतानाही आता पुन्हा या फिक्सिंग प्रकाराने डोके वर काढले असून झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटू टेलर याने तर आता मोठा धक्का दिला आहे. फिक्सिंग प्रकार उघडकीस येऊ लागल्यापासून क्रिकेट बदनाम झाले आहेच पण क्रिकेट पाहणाऱ्या रसिकात देखील घट झाली आहे. प्रत्येक मॅच फिक्स असते अशाच नजरेने अनेकजण या खेळाकडे पाहू लागले असून एका लोकप्रिय खेळाला हे फार मोठे ग्रहण लागलेले आहे. मधल्या काही काळात हा विषय चर्चेतून काहीसा बाजूला पडला होता पण आता टेलर याच्या दाव्याने मोठी खळबळ उडवून दिली आहे.
भारतात बोलावून आपणास कोकेन देऊन त्याचे शूटिंग करण्यात आले आणि त्याद्वारे आपणास ब्लॅकमेल केले गेले असे त्याने सांगितले आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये मला स्पॉन्सरशीप आणि झिम्बाब्वेमध्ये टी २० स्पर्धा भरविण्याबाबत चर्चा करण्यासाठी म्हणून मला भारतात बोलावले आणि प्रवासासाठी १५ हजार अमेरिकन डॉलर दिले जातील असेही सांगितले होते. मनात भीती होती पण ही संधी मी नाकारू शकत नव्हतो. सहा पाण्यापासून मला झिम्बाब्वे क्रिकेटकडून पैसे मिळालेले नव्हते, शिवाय भविष्यात झिम्बाब्वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल की नाही याचीही माहिती नव्हती त्यामुळे आपण भारतात प्रवास करण्याचा निर्णय घेतला असे तो म्हणाला.
भारतात पोहोचल्यानंतर चर्चाही झाली पण उद्योगपती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जेवणासाठी नेले तेंव्हा आम्ही मद्यपान केले आणि त्याचवेळी त्यांनी मला कोकेन ऑफर केलं. त्यांच्यासोबत मी देखील कोकेनचे सेवन केले, अर्थात हा माझा मूर्खपणा होता. दुसऱ्या दिवशी मात्र हीच माणसं माझ्या हॉटेलवर आली आणि त्यांनी रात्री मी कोकेन घेतल्याचा व्हिडीओ दाखवला. 'आपण जर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅच दरम्यान स्पॉट फिक्सिंग नाही केले तर हा व्हिडीओ सार्वजनिक करू' अशी धमकी मला देण्यात आली. सहा जण हॉटेलवर आल्याने मला भीती वाटत होती. यावेळी मला १५ हजार अमेरिकन डॉलर दिले आणि हे डिपॉझिट असल्याचे सांगितले, स्पॉट फिक्सिंग केल्यानंतर उरलेले २० हजार डॉलर देण्यात येतील असेही सांगण्यात आले. तेथून स्वतःची सुटका करून घेण्यासही आपण रक्कम घेतली आणि भारताच्या बाहेर पडलो. पैसे घेण्याशिवाय माझ्याकडे दुसरा मार्ग नव्हता आणि त्यामुळे मला हे पैसे घ्यावे लागले' अशी कबुलीही टेलर याने दिली आहे.
सदर प्रकरण मी चार महिन्यांनी आयसीसीला सांगितले, आपल्यावर प्रचंड मानसिक आणि शारीरिक ताण आलेला होता आणि मला माझ्यासह कुटुंबाला सुरक्षित करायचं होतं. सगळा प्रकार आपण सांगितलं सून आपण कधीही कसलेही फिक्सिंग केलेले नाही, पण जे घडले त्यावर आयसीसी माझ्यावर जी कारवाई करील त्याचा स्वीकार करायला आपण तयार आहोत असेही टेलर याने सांगितले आहे. भारतात त्याला कुणी ब्लॅकमेल केलं आणि तो उद्योगपती कोण ? याचीही आता चौकशी होण्याची गरज असून टेलर याने सांगितलेले सर्व सत्य आहे काय याचीही पडताळणी होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. परंतु या निमित्ताने पुन्हा एकदा क्रिकेटमधील फिक्सिंग चर्चेला आले आहे.
वाचा :> पंढरपूर तालुक्यातील २० एकर ऊसाला आग !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !