वर्धा : नदीच्या पुलावरून चार चाकी गाडी खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात सात शिकाऊ डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत भीषण आणि तितकीच दुर्दैवी घटना मध्यरात्री घडली आहे.
एका चार चाकी वाहनातून वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी देवळी येथून वर्ध्याकडे निघाले होते. वर्ध्याला येत असताना सेलसुराजवळ हा भीषण अपघात घडला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात होऊन नदीच्या पुलावरून चार चाकी वाहन खाली कोसळले. गाडी जवळपास चाळीस फुट खाली कोसळली आणि सातही शिकाऊ डॉक्टरांचा जागीच अंत झाला आहे. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली असून मृत्युमुखी पडलेले सर्व शिकाऊ डॉक्टर हे पंचवीस ते तीस वर्षे वयाच्या दरम्यानचे होते.
अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व विद्यार्थी हे सांगवी येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होते. अपघाताची माहिती मिळताच वर्धा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप, सांगवी पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले आणि पहाटेपर्यंत मृतदेह बाहेर काढायचे काम सुरु होते. मृतदेह शिवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. या घटनेने सांगवी येथील वैद्यकीय महाविद्यालय शोकाकुल झाले असून मृतदेहाची ओळख पटली आहे.
गोंदियातील तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांचा मुलगा आविष्कार याचा या मृतात समावेश आहे. नीरज चौहान एमबीबीएस- प्रथमवर्ष, नितेश सिंग, एमबीबीएस (२०१५), विवेक नंदन, एमबीबीएस फायनल पार्ट-१ (२०१८), प्रत्यूष शिंग, एमबीबीएस फायनल पार्ट २ (२०१७), शुभम जयस्वाल एमबीबीएस फायनल पार्ट २ (२०१७), पवन शक्ती - एमबीबीएस फायनल पार्ट-१ (२०२०) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !