BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ जाने, २०२२

पंढरपूर तालुक्यात वीस एका ऊसाला आग !


 

पंढरपूर : विद्युत मंडळाच्या दुर्लक्षाचा मोठा फटका शेतकऱ्याला बसला असून पंढरपूर तालुक्यातील खेड भोसे शिवारातील जवळपास २० एकर साला आग लागली आणि लाखोंच्या नुकसानीचा दणका शेतकऱ्याला बसला आहे. 


खेड भोसे येथील कारखान्याच्या वाटेवर असलेला ऊस विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे जळून गेल्याची घटना घडली आहे. सहा शेतकऱ्यांच्या सुमारे २० एकरातील उसाला आग लागली त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पंढरपूर तालुक्यातील खेड भोसे येथील बाळासाहेब वासुदेव पवार, तुकाराम राजाराम साळुंखे, मधुकर भानुदास पवार, हनुमंत ज्ञानोबा पवार, बाळासाहेब वसंत साळुंखे, आणि आण्णा जाधव या शेतकऱ्यांची शेती परस्परांना लागून आहे. या सर्व शेतकऱ्यांच्या शेतात उसाचे पीक आहे आणि उसाची पूर्ण वाढ झालेली होती. पंधरा वीस दिवसात हा ऊस कारखान्याला जाणार होता.  या क्षेत्रातून जाणाऱ्या वीजवाहक तारामुळे शॉर्ट सर्किट झाले आणि उसाला आग लागली. 


हातातोंडाशी आलेल्या उसातून आगीच्या ज्वाळा दिसू लागल्याने शेतकऱ्यांना धक्का बसला आणि त्यांनी जिवाच्या आकांताने ही आग विझविण्याचा प्रयत्न केला पण या दरम्यान सुटलेल्या हवेमुळे आग अधिकच भडकली आणि जवळपास वीस एकर क्षेत्रातील ऊस जळून मोठे नुकसान तर झालेच पण ठिबक सिंचन संच , पाईप, केबल अशा साहित्याचीही राख झाली आणि त्याबरोबर शेतकऱ्याने पाहिलेल्या स्वप्नांचीही राख झाली. प्रचंड कष्टाने शेतकऱ्याने ऊस वाढविलेला असतो, त्यासाठी मोठा खर्चही केलेला असतो. खत, औषधे बाजारातून उधारीवर आणलेली असतात आणि ऊस कारखान्याला गेला आणि बिले आली की ही उधारी चुकवायची असते. पंधरा वीस दिवसात हा ऊस कारखान्याला गाळपासाठी जाणार होता पण त्या आधीच आगीने प्रचंड नुकसान केले आहे. 


जळालेल्या उसाला साखर कारखाना वेगळा आणि कमी दर देत असते. चांगल्या उसाला वेगळा आणि जळीत उसाला वेगळा दर अशी साखर कारखान्याची पद्धत असते त्यामुळे जळीत उसाला खूप कमी रक्कम कारखान्याकडून मिळत असते. जळीत उसाच्या बाबतीत प्रतिटन दीडशे रुपये कपात करण्यात येते त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च निघणेही कठीण  जात असते. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊस जळून देखील एकही शेतकऱ्याने महावितरणकडे अदयाप तक्रार केली नसल्याचे समजते. शेतकऱ्यांनी अद्याप तक्रार का केली नाही हे समजू शकले नाही. सदर आग विजेच्या तारांमधून शॉर्ट सर्किट होऊन लागली असल्याचे शेतकरी सांगत आहेत. 

        

अलीकडे महावितरण सगळ्याच बाजूनी शेतकरी बांधवाच्या मुळावर आल्याचे दिसू लागले आहे. शेतकरी सतत एकाचवेळी अनेक संकटात घेरलेला असतो परंतु या अन्नदात्यांचे संकट बाह्यस्वरुपात कुणालाच  दिसत नाही. रात्री वीज येते म्हणून शेतकऱ्याला रात्रीची झोप मिळत नाही आणि कधी विद्युत पुरवठ्यात समस्या निर्माण झाली तर वेळेत ती दुरुस्त केली जात नाही. विजेची बिले भरली नाहीत म्हणून विद्युत पुरवठा खंडित केला जातो, शेतकऱ्यांची उभी पिके जळताना महावितरणला थोडीशी देखील वेदना होत नाही ही बाब तर नेहमीच आहे परंतु ग्रामीण भागातील विद्युत यंत्रणेची वेळच्यावेळी देखभाल केली जात नसल्याच्या तक्रारी शेतकरी नेहमीच करीत असतात. रोहित्राच्या फ्युजपेटीत फुटक्या फ्युज आणि दरवाजा नसलेल्या पेट्या अनेक ठिकाणी पहायला मिळत असतात.


देखभाल दुरुस्ती नसल्याने शेतकरी बांधवाचे प्राण देखील सतत संकटात असतात. विजेची तार तुटून अनेकदा पिकात पडते आणि शेतकऱ्याचा पाय पडून शेतकरी शॉक लागून मृत्युमुखी पडतो अशा घटनाही अधूनमधून  घडत असतात. दोन खांबामधील विजेच्या तारा 'झोके' घेत असतात पण वेळीच  दिले जात नाही आणि मग या तारा तुटतात किंवा परस्परांना घासून उभ्या पिकात ठिणग्या पडून आग लागते आणि  हातातोंडाशी आलेले शेतकऱ्याचे पीक जाळून खाक होते. अनेक संकटात घेरलेला शेतकरी पुन्हा एका नव्या संकटात अडकून पडतो आणि त्यांच्या सक्षमपणे उभे राहण्याची संधीच मिळत नाही. अशा घटना पुनः पुनः घडू नयेत यासाठी महावितरणने कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची गरज असल्याचे मत शेतकरी बांधवांतून व्यक्त होत आहे     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !