पंढरपूर : पंढरपूर - मोहोळ मार्गावर झालेल्या 'त्या' अपघातातील जखमी भावाचा उपचार घेताना मृत्यू झाला असून या मार्गावरील अपघाताच्या बळीत आणखी एक भर पडली आहे.
पंढरपूर- मोहोळ मार्गाचे रुंदीकरण आणि नुतनीकरण सुरु आहे. रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. पंढरपूर ते मोहोळ या दरम्यान अलीकडच्या काळात अनेक अपघात झाले आहेत. कार आणि मोटार सायकल यांच्यात समोरासमोर धडक होऊन आणखी एक अपघात नुकताच शनिवारी झाला होता. पंढरपूरकडून मोहोळच्या दिशेला निघालेल्या कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार खंडू नागनाथ गोडसे (वय ३२ ) हे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना पंढरपूर येथे उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु दुर्दैवाने उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.
तुंगत येथील एका बांधकामावर मजुरीने काम करणारे खंडू गोडसे हे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी पेनूर येथे गेले होते. बहिणीची भेट घेऊन दुचाकीवरून ते परत आपल्या गावी जात असताना रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान आढेगावकर वस्तीजवळ हा अपघात झाला होता. समोरून येणाऱ्या कारने (एम एच १४ जे आर ६२३२) गोडसे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला होता. या अपघातात गोडसे यांना मार लागून ते गंभीर जखमी झाले होते. अखेर उपचार घेताना त्यांचा मृत्यू झाला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !