शोध न्यूज : मिचाँग चक्रीवादळाचा मोठा परिणाम वातावरणावर झाला असून, आता महाराष्ट्रासह १९ राज्यात अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून, गारपीठ होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून देशातील अनेक भागातील वातावरण बदलून गेले आहे. त्याआधीच चक्रीवादळाचे संकेत हवामान विभागाने दिले होते. बंगालच्या उप सागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आणि त्याचे रुपांतर चक्री वादळात झाले आहे, या चक्री वादळाला मिचाँग असे नाव देण्यात आले आहे. या वादळाचा परिणाम देशाच्या विविध भागात दिसत असून आता अवकाळीचा तडाखा बसणार असल्याचे दिसत आहे. डोंगरी भागात हिमवृष्टी झाल्यामुळे उत्तरेत थंडीचा कडाका वाढत आहे तर काही राज्यात ढगाळ हवामान असून मुसळधार पाऊस कोसळत आहे. यातच भारतीय हवामान विभागाने अंदाज व्यक्त करीत अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यानुसार आगामी चोवीस तासांत महाराष्ट्र तसेच अन्य १९ राज्यात हा पाऊस कोसळू शकतो असे हवामान विभ्गाने सांगितले आहे.
काही राज्यात मुसळधार पावसासह गारपीठ देखील होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. चेन्नईत झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर देखील नद्या वाहताना दिसून येत आहेत, या वादळाने तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यांना जोरदार तडाखा दिला आहे. चक्रीवादळामुळे होत असलेल्या मुसळधार पावसाने आत्तापर्यंत १७ जणांचा बळी देखील गेला आहे. शिवाय जनजीवन पूर्णत: विस्कळीत करून टाकले आहे. खूप मोठा फटका बसत असतानाच आता आणखी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या परिस्थितीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह देशातील १९ राज्यांसाठी हवमान विभागाने हा अंदाज व्यक्त केला आहे. छत्तीसगड, ओडिशा, पूर्व मध्य प्रदेश, किनारी आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि अंदमान निकोबार बेटांवर हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज केरळ आणि तामिळनाडूमध्ये काही प्रमाणात हलका पाऊस पडेल. ८ आणि ९ डिसेंबरला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
झारखंड, बिहारचा काही भाग, दक्षिण-पूर्व उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. स्कायमेट या संस्थेने देखील असाच अंदाज व्यक्त केला असून पुढील ४८ तासांत नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय आणि आसाममध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. (Unseasonal rains in many states, including Maharashtra) अरुणाचल प्रदेशात हलका पाऊस पडू शकतो. आज ईशान्य भारतात पावसाचा जोर वाढू शकतो. एकंदर देशाच्या विविध भागात अवकाळीचे संकट गडद होताना दिसत असून पुढील दोन दिवस हे चिंतेचे असणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !