शोध न्यूज : सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर आणखी एक अपघात झाला असून या अपघातात दोन सख्ख्या भावांना चिरडून मारून चार चाकी चालक न थांबता पुढे निघून गेल्याची मोठी घटना घडली आहे.
उगवलेला प्रत्येक दिवस अपघाताची बातमी घेवून येत असून, अपघात हे आता नित्याचेच झाले आहेत. रस्त्यावरील निष्पाप जीवांची परवा न करता अनेक वाहन चालक बेपर्वाईने आपली वाहने चालवत आहेत, रस्त्यावरील नागरिक कुणाच्या तरी घाईमुळे आपला जीव गमावत आहे. प्रत्येकाला मोठी घाई झालेली असते पण निष्पाप जनतेचा मात्र बळी जात आहे. तरीही कुणी कुणाच्या जीवाची पर्वा करताना दिसत नाही. (Accident Solapur - Pune highway )दळणवळणासाठी रस्ते रुंद आणि सिमेंटचे बनविण्यात आले आहेत. एकीकडे ही मोठी सुविधा झाल्याचे दिसत असतानाच हे रस्ते शाप देखील ठरू लागले आहेत. गेल्या चार वर्षांत अपघाताचे प्रमाण बेसुमार वाढलेले आहे आणि दरवर्षी हजारो नागरिकांचे जीव केवळ या अपघातामुळे जाताना दिसत आहेत. आता पुन्हा सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर दोन सख्ख्या भावांना आपला जीव गमावण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.
सोलापूर - पुणे महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या दोन सख्ख्या बंडूना एका इनोव्हा गाडीने चिरडून मारले आहे. लाल रंगाच्या एका अज्ञात इनोव्हा गाडीने केडगाव येथील कैलास शेळके (५८) आणि पांडुरंग शेळके (५५) या दोघांना जोराची धडक दिली. त्यानंतर या गाडीने शंभर फुट फरफटत नेले आणि या दोघांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. एवढा प्रताप करून अज्ञात कार चालक अपहातानंतर थांबला नाही तर तो घटनास्थळावरून निघून गेला. दोघांना चिरडल्यानंतर तो तेथून वेगाने पळून गेला आहे. अपघात घडताच ग्रामस्थ धावत आले आणि त्यांनी दोघानाही यवत येथील रुग्णालयात हलवले परंतु त्याचा उपयोग झाला नाही. या घटनेमुळे केडगाव ग्रामस्थ सुन्न झाले असून, संताप देखील व्यक्त होऊ लागला आहे. यवत तसेच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अज्ञात वाहन चालकाचा आणि त्या वाहनाचा शोध घेण्यात येत आहे. एकाच अपघातात दोन्ही बंधूंचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !