BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ नोव्हें, २०२३

उजनी धरणातून सोडणार शेतीसाठी पाणी !

 



शोध न्यूज : यावर्षी पावसाने दगा दिल्याने चिंतेत असलेल्या बळीराजाला काहीसा दिलासा मिळू लागला असून, उजनी  धरणातून उद्या म्हणजे ४ नोव्हेंबरपासून शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. तरीही कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचा निर्णय महत्वाचा आहे.


यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच बळीराजा चिंतेत आहे, आभाळाकडे पहात संपूर्ण पावसाळा निघून गेला पण अपेक्षित पाऊस झालाच नाही, ऐन पावसाळ्यात पिण्याच्या  पाण्याची टंचाई निर्माण झाली तर, हातची पिके डोळ्यादेखत उध्वस्त होण्याची वेळ आली. अखेरच्या टप्प्यात काही प्रमाणात का होईना, पुणे परिसरात झालेल्या पावसाने, उजनी धरणाला दिलासा मिळाला आणि त्याचाच परिणाम म्हणून, आता उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी हा खूप मोठा दिलासा मानला जात आहे. भविष्यातील संकटाचे संकेत मात्र, या आधीच मिळाले आहेत, त्यामुळे पाण्याचा वापर अत्यंत काळजीने आणि काटकसरीने करावा लागणार आहे. खरीपाची पिके वाया गेली पण आता रब्बीसाठी पाण्याच्या आवश्यकता आहे. अनेक भागात अपेक्षित पेरणी देखील झालेली नाही परंतु उजनी धरणातून पाणी सोडण्यासाठी तत्वत: मंजुरी मिळालेली आहे.


तत्वत: मान्यता मिळूनही उजनीतून पाणी सोडले नाही, लक्ष आता कालवा सल्लागार समितीच्या निर्णयाकडे ! आजची बैठक महत्वाची !


उजनी धरणातून १ नोव्हेंबर पासून पाणी सोडण्यास ही मान्यता मिळाली होती पण अजूनही हे पाणी सोडले गेले नाही. कालवा सल्लागार समितीची बैठक आज होणार असून त्या निर्णयानुसार उद्या ४ नोव्हेंबर पासून पाणी सोडले जाईल अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे. शेतकरी पावसाची वाट पाहून थकले आहेत आणि आता उजनी धरणाच्या पाण्याची वाट पहात आहेत. उजनी धरण यावर्षी पूर्ण क्षमतेने भरू शकले नाही, ९२.७९ टीएमसी एवढा पाणी साठा उजनी धरणात असला तरी जवळपास १८ ते २० टीएमसी एवढा गाळच आहे. शिवाय दहा ते पंधरा टीएमसी एवढे पाणी उजनी धरणात राखीव ठेवण्यात येत असते. त्यामुळे धरणातील ५० टीएमसी एवढे पाणी वापरले जाऊ शकतो. काही दिवसांवर आलेल्या कार्तिकी वारीसाठी एक आवर्तन सोडावे लागणार आहे आणि शेतीसाठी दोन आवर्तने दिली जातील. त्यानंतर मात्र शिल्लक पाणी हे केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार आहे.


१ नोव्हेंबर पासून शेतीसाठी पाणी सोडण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीत तत्वत: मान्यता मिळाली असली तरी आजपर्यंत पाणी सोडले गेले नाही आणि याबाबत अंतिम निर्णय देखील झाला नाही. त्यामुळे या निर्णयाची प्रतीक्षा लागलेली आहे. उजनी धरणातील पाण्याचा साठा कमी झाल्यावर कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडले जात नाही. (Water for agriculture will be released from Ujani Dam)  उद्या म्हणजे ४ नोव्हेंबर पासून कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडले जाईल आणि ते ३० ते ३५ दिवस सुरु राहील अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अधिकारी सांगत आहेत परंतु कालवा सल्लागार समिती काय निर्णय घेतेय यावर सगळे काही अवलंबून आहे. त्यामुळे बळीराजाचे डोळे आता कालवा सल्लागार समितीच्या निर्णयाकडे लागले आहेत. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !