शोध न्यूज : शेतीच्या पाणी देणाऱ्या पाटबंधारे विभागातील अधिकारी साडे तीन लाखांची लाच घेताना रंगेहात सापडला असून त्याने तब्बल सात लाखांची मागणी केल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले होते. या घटनेने जलसंपदा विभागात खळबळ उडाली आहे.
शासकीय विभागातील लाचखोरी काही नवीन नाही उलट ती वाढतच चालली आहे, पोलीस, महसूल आणि महावितरण विभागातील लाचखोरीची प्रकरणे सतत उघडकीस येत असली तरी अन्य विभागात देखील ही खाऊगिरी सुरूच असते. जलसंपदा विभागात देखील मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरु असतात, शेतकऱ्यांना देण्यात येणारे पाणी नको त्या जमिनीत मुरते आणि संबंधिताच्या खिशात नोटांचे पिक उगवते. विविध कामे आणि पाणी वाटप यात सावळा गोंधळ सुरूच असतो, ठेकेदार आणि अधिकारी यांच्यातील संबंध अत्यंत 'जिव्हाळ्याचे' असतात पण हेच 'गोड' असलेले संबंध कधीकधी भलतेच कडू होतात. असाच प्रकार खेड तालुक्यातील करंजविहीरे येथील जलसंपदा उप विभागीय अधिकाऱ्याला अनुभवला आलेला आहे. भामा आसखेड सिंचन व्यवस्थापनातील उप विभागीय अधिकारी तुळशीदास आश्रू आंधळे या ५७ वर्षे वयाच्या अधिकाऱ्याला निवृत्तीच्या आधीच एक वर्षे हातात बेड्या पडल्या आहेत. (Irrigation officials caught red-handed in taking bribes) या घटनेने जलसंपदा विभागात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून उप विभागीय अभियंता आंधळे याला अटक करण्यात आली आहे.
तक्रारदाराच्या जमिनीचे सपाटीकरण आणि विकासाचे काम सुरु असून येथे भामा आसखेड सिंचन व्यवस्थापन उपविभागाचे उप अभियंता तुळशीदास आंधळे यांनी भेट देवून पाहणी केली. सदर काम हे . पूर रेषेच्या आतमध्ये सुरु असून त्याविरोधात कारवाई करणार असल्याचे आंधळे याने सांगितले. सदर कारवाई टाळायची असल्यास सात लाख रुपये देण्याची मागणी या उप विभागीय अभियंत्याने केली. तक्रारदार यांनी या प्रकरणी थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले आणि जलसंपदा विभागाच्या या अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार दिली. सदर विभागाने याची पडताळणी केली असता लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले. सात लाखांची मागणी करून त्यापैकी साडे तीन लाख आधी घेवून येण्यास सांगितल्याचे पडताळणीत दिसून आले त्यामुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. मोदिबग येथील पेट्रोल पंपावर रक्कम घेवून येण्यास सांगितले असल्याने पंपावरच हा सापळा लावण्यात आला होता. ठरल्याप्रमाणे आंधळे तेथे आला आणि त्यांने साडे तीन लाखांची लाच स्वीकारताच त्याच्यावर झडप घालून रंगेहात पकडण्यात आले. पैसे घेवून तो रस्ता ओलांडून जात असतानाच त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !