शोध न्यूज : सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर अत्यंत भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून जवळपास २० प्रवासी जखमी झाले आहेत. आज पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला.
सोलापूर - पुणे महामार्गावर दौंड तालुक्यातील चौफुला येथे आराम बस एका ट्रकला जाऊन धडकून ही दुर्घटना घडली आहे. सोलापूर येथून एक आराम बस पुण्याकडे निघाली असताना रस्त्यात उभ्या असलेल्या एका ट्रकला ही बस धडकली आहे. ही बस सोलापूर येथून ३५ प्रवासी घेवून पुण्याला निघाली होती. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही बस चौफुला परिसरात आली. दरम्यान टायर फुटल्याने एक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आला होता. वेगात निघालेली बस थेट या ट्रकवर जाऊन आदळली आणि एक मोठा आवाज झाला. बसमधील काही प्रवासी अर्धवट झोपेत होते परंतु अपघात होताच सगळ्यांचीच झोप उडाली आणि प्रवाशी घाबरून गेले. या घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून वीस प्रवासी जखमी झाले आहेत, यातील पाच प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.
- सदर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चार जणांत तिघे हे पोलीस कर्मचारी असल्याची माहिती मिळत आहे. यातील नितीन शिंदे हे पोलीस कर्मचारी आहेत याची निश्चित माहिती प्राप्त झाली आहे.
अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले असून या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यात तीन पुरुष आणि एक महिला आहे. अमर कलशेट्टी, गणपत पाटील, पोलीस कर्मचारी नितीन दिलीप शिंदे आणि आरती बिराजदार यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात होताच यवत पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना केडगाव, चौफुला आणि पुण्यातील रुग्णालयात दाखल केले गेले आहे. वेगातील बस उभ्या ट्रकवर धडकल्याने अपघाताची भीषणता मोठी असून या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे. (Four killed in accident on Solapur-Pune National Highway)पहाटेच्या दरम्यान हा अपघात झाला असून एकच गोंधळ उडाला. रस्त्यावर वाहनांची मोठी गर्दीही झाली होती. महामार्ग पोलीस, यवत पोलीस आणि स्थानिकांनी जखमींना मदत करीत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !