शोध न्यूज : पारंपारिक पिकांची शेती परवडत नाही त्यामुळे शेतात गांजा लावण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी एका कृषी अभियंत्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आणि चर्चा सुरु झाली आहे.
शेतकरी हा सतत अडचणीत असलेला घटक आहे, दिवसरात्री घाम गाळतो परंतु त्याच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होत नाही उलट तो कर्जबाजारीच बनत चालला आहे. कर्जबाजारी होऊन हजारो शेतकऱ्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. शेतीमालाला बाजारभाव मिळत नाही, लहरी निसर्गाचा दणका तर सतत सहन करीत आहे त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू आणि काळजातील चिंता ही कधीच संपत नाही. अलीकडे अनेक शेतकरी ऊस, कांदा अशा पिकात गांजाची लागवड करताना पोलिसांकडून पकडला जातो. गांजा लागवड करणे, बाळगणे, विक्री करणे अशा कृत्याला भारतात कायद्यानेच बंदी आहे परंतु तरीही शेतकरी हे धाडस करीत आहे. पारंपारिक शेती आणि पिके परवडत नसल्याची तक्रार आहे त्यामुळे तो अशा प्रकारचे बेकायदा उद्योग करण्याचा प्रयत्न करतो आणि अधिकच संकटात येतो. त्यामुळे बळीराजाने असे पाउल उचलणे हे त्यालाच अडचणीत टाकणारे ठरते.
देशात कायद्याने बंदी असतानाही काही शेतकरी गांजा लागवड करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज करून परवानगी मागताना दिसतात. अलीकडेच सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील एका शेतकऱ्याने जिल्हाधिकारी यांच्याकडे अशीच मागणी केली होती. परवानगी तर मिळालीच नाही पण जिल्हाधिकारी यांनी त्यांना खडे बोल सुनावले होते. त्यानंतर आता असाच प्रकार बीड जिल्ह्यातून समोर आला आहे. कृषी अभियंता असलेल्या एका शेतकऱ्याने जिल्हाधिकारी यांना एक निवेदनच दिले आहे आणि गांजाची शेती करण्यासाठी परवानगी मागितली आहे. याची चर्चा राज्यभर होऊ लागली असून त्यांनी केलेला अर्ज समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. अवकाळी पाऊस आणि सुलतानी संकटामुळे बळीराजा हवालदील झाला आहे. अशातच शेतमालाला भाव नाही, ऊस गाळपाचे नियोजन नाही म्हणून गांजा शेती करू द्यावी, अशी मागणीच कृषी अभियंता असलेल्या शुभम भास्कर माने यांनी बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.
आपण वाघिरा येथील सुशिक्षित बेरोजगार तरुण असून सोयाबीन, कापूस, तूर अशा पारंपारिक पिकांना जिल्ह्यात दर मिळत नाही यामुळे अशी पिके घेणे हे परवडत नाही, ऊसाची लागवड करायची म्हटल्यास पाण्याचा प्रश्न समोर असतो. मागील वर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न उभा राहिला होता, उसाला तोड मिळणे अवघड झाले असून गेल्या वर्षी नोव्हेंबर, डिसेंबरला लागवड केलेला ऊस अजूनही शेतातच आहे. त्यामुळे उसाचे वजन घटत जात आहे. अशा विविध अडचणीमुळे ऊसाचे पिक घेणे परवडत नाही शिवाय बीड जिल्ह्यात इतर उद्योग धंदेही नाहीत त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. (Demand for permission to cultivate cannabis in the field) शेतकऱ्यांना अशा संकटातून बाहेर काढण्यासाठी गांजा लागवडीची परवानगी द्यावी असे पत्र या कृषी अभियंत्याने जिल्हाधिकारी यांना दिले आहे. अर्थात हे सगळे बेकायदा असल्यामुळे परवानगी तर मिळणार नाही हे उघडच आहे पण जिल्हाभर चर्चा होऊ लागली असून राज्यभर ते पत्र मात्र व्हायरल होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !